कऱ्हाड : ‘माणसाचे शरीर निकोप ठेवावे लागते. निकोप स्वास्थ्याचीही गरज आहे. हे करायचं असेल तर औषधोपचार करावा लागतो. मग कोणाचा आजार गोळ्याने बरा होतो तर काहींचे आॅपरेशनही करावे लागते. अशाच पद्धतीने आम्हालाही कारखाना चालविताना कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. कृष्णा कारखान्याला जडलेला आजार मोठा आहे. तो बरा तर करायचाच आहे. कारखानारूपी पेशंट बरा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,’ असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी केले. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथे जाहिर मेळाव्यात ते बोलत होते. कृष्णा बँकचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, नवनिर्वाचित उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, जितेंद्र पाटील, सुजित मोरे, विठ्ठलराव जाधव, आनंदराव मोहिते, एम. के. कापूरकर उपस्थित होते. डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘राज्यातला नावाजलेला कारखाना म्हणून एकेकाळी कृष्णा कारखान्याची ओळख होती. पण आज सर्वात कर्जबाजारी कारखाना म्हणून आपल्या कारखान्याची ओळख निर्माण करून ठेवली आहे. सुमारे ५0६ कोटी रूपयांचे कर्ज आज कारखान्यावरती आहे. तर शिल्लक साखरेवरही २१0 कोटी रूपये कर्ज घेतले आहे. साखरेच्या आजच्या बाजारभावाने अंदाजे १६१ कोटी रूपये फक्त साखरेतून मिळू शकतात. मग उरलेले पैसे द्यायचे कोठून?, हा प्रश्न आहे. पण काळजी करू नका. हे मला पेलणार नाही असे वाटले असते तर मी पॅनेलच उभे केले नसते. कारखान्याला सुस्थितीत आणण्यासाठी सर्वांची मदत गरजेची आहे. कारखान्यातील साखरेच्या पोत्यांचा हिशोब लागत नाही. पंपावरच्या डिझेलचा मेळ बसत नाही. ३ हजार २६६ कामगार नेमले आहेत. त्यातील १ हजार ५00 तात्पुरते आहेत. त्यातील कामावर किती येतात हे देव जाणे. त्याचा बोजा कारखान्यावर पडला असून कारखान्याची पत ढासळली आहे. यामुळे कारखाना चालवण्यासाठी पैसे उभे करावे लागतील.’ (प्रतिनिधी)
कारखानारूपी पेशंट बरा करणार : भोसले
By admin | Published: July 05, 2015 1:11 AM