सातारा : तामकणे गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला चुकीची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याशी धरणग्रस्तांनी चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने श्रमिक मुक्ती दलातर्फे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाथाची पाग या कोयना धरणातील धरणग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाचा १० वा दिवस होता. सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते.
या चर्चेवेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर यांनी नाथाची पाग येथील पाणी योजना मंजूर करताना चुकीच्या पद्धतीने तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना रद्द करावी व दुसºया जवळच्या पाण्याच्या उद्भवापासून म्हणजेच चिटेघर धरण किंवा केरा नदीवरून पाणी योजना तामकणे गावासाठी करावी, अशी भूमिका मांडली. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ही योजना पूर्ण करण्याबाबत पालकमंत्र्यांचे आदेश असून, ती योजना कुठल्याही परिस्थितीत बंद करता येणार नाही, असे स्पष्ट केले. तर धरणग्रस्तांनी सूचविलेल्या जागेतून योजना करायची झाल्यास तिचा खर्च वाढेल, असे मत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी मांडले.
तसेच पालकमंत्री व संबंधित आमदारांच्या उपस्थितीत बैठक लावून निर्णय घेता येईल, असेही स्पष्ट केले. दोन आठवड्यानंतर नियोजन समितीची बैठक घेण्यात येण्यात येणार आहे, या बैठकीत निर्णय होईल, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्याची सूचना जिल्हाधिकाºयांनी केली.आंदोलन मागे घेतो; पण पाणी योजनेचे काम थांबवत असल्याचे पत्र द्या, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली.
मात्र, प्रशासनाने त्याला स्पष्ट नकार दिल्याने धरणग्रस्त कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट करत धरणग्रस्त चर्चेतून बाहेर पडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी परतलेल्या धरणग्रस्तांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी चैतन्य दळवी, अॅड. व्यासदेव शेळके, जयराम शेळके, कृष्णात शेळके, सचिन शेळके आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.