रहिमतपूर : सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक पदावर नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन दोन युवकांची ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी येथील दोघांवर रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी रोहित ऊर्फ सागर सदाशिव पवार याला अटक करण्यात आली आहे.रोहित ऊर्फ सागर सदाशिव पवार (वय ४०) व निहाल इनामदार (दोघेही रा. पिंपरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.सुमन नामदेव तावरे (रा. तारगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी दिलेले फिर्यादीत म्हटले आहे की, माझा भाचा गणेश महादेव तावरे याला नोकरी नसल्याने त्याचे लग्न होत नव्हते. मैत्रिणीच्या सांगण्यावरून पिंपरी येथील ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याकडे भाच्याचे लग्न जुळवण्यासाठी संपर्क साधला. लग्नाबाबत चर्चा करताना ज्ञानेश्वर साळुंखे यांनी माझा मित्र रोहित ऊर्फ सागर पवार हा शासकीय नोकरी लावत असल्याचे सांगितले. साळुंखे यांच्या माध्यमातूनच २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पिंपरी येथे रोहित पवार याच्याशी भेट झाली. त्याने एकाला सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य खात्यात नोकरी लावण्यासाठी दीड लाख रुपये लागत असल्याचे सांगितले. माझा भाचा गणेश महादेव तावरे व दुसरा भाचा महेश महादेव तावरे या दोघांना नोकरी लावण्यासाठी वेळोवेळी तीन लाख रुपये रोहित पवार याला दिले. ४ एप्रिल २०२२ रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरात आम्हाला बोलावून रोहित पवार याने त्याचा सहकारी निहाल इनामदार याच्या हस्ते गणेश तावरे व महेश तावरे या दोघांचेही सातारा जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पदावरील नियुक्तीपत्र दिले. २० मे २०२२ रोजी सातारा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील टेबल नंबर ५ ला सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे नियुक्तीपत्रकात उल्लेख केला होता. मात्र, नियुक्तीपत्रावर हजर राहण्याच्या दिलेल्या तारखेच्या आठ दिवस अगोदर रोहित पवार याने फोन करून जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रियेवर स्टे आल्याचे सांगितले. तसेच स्टे उठल्यानंतर नवीन नियुक्तीपत्रक देणार असल्याचे सांगून जिल्हा परिषदेत जाऊ नका, असे सांगितले. यानंतर वारंवार रोहित पवार याला फोन करून नियुक्तीपत्र कधी देणार, अशी विचारणा केली असता त्याने वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरूनच त्याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने रहिमतपूर पोलिस ठाण्यात रोहित पवार व त्याचा सहकारी निहाल इनामदार या दोघांविरोधात १९ मे २०२४ रोजी तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने रोहित ऊर्फ सागर पवार याला अटक केली असून, निहाल इनामदार याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास रहिमतपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव विभुते करत आहेत.
रोहित पवारवर यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे..संशयित रोहित पवार व निहाल इनामदार यांनी जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक या पदावर नोकरी लावतो, असे आश्वासन देऊन यापूर्वी गणेश भोसले (रा. वेळू, ता. कोरेगाव) याच्याकडून ऑगस्ट २०२१ ते २२ एप्रिल २०२२ या दरम्यान दीड लाख रुपये घेऊन नियुक्तीचे बनावट पत्र देऊन फसवणूक केली होती. तसेच साप (ता. कोरेगाव) येथील सत्यम अडसुळे या युवकालाही आरोग्य सेवक पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्याच्याकडून २ लाख ८० हजार रुपये घेतले होते. बेलेवाडी, ता. कोरेगाव येथील आकाश मोहिते या युवकालाही जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केली आहे. संशयित रोहित पवार याला अशाच प्रकरणांमध्ये उंब्रज पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अटक केली होती.