फलटण : फलटण शहर व तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर कोरोनाचा कहर झाला आहे. दररोज कोरोनाने अनेकांचा मृत्यू होत असताना अजूनही अनेक लोक फलटण शहरातून फिरत आहेत. त्यासाठी अनेकांनी बनावट ओळखपत्र तयार केले आहेत. यामुळे बाहेर पडणाऱ्या सर्वांचीच कोरोना टेस्ट करावी, अशी मागणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
फलटण शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर झाला आहे. आतापर्यंत हजारो लोकांना या आजाराची लागण झाली आहे. यामध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही अनेक लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. यामध्ये अनेक लोक मास्कचाही वापर करीत नाहीत. यामुळे फलटण शहरात अजूनही ‘आवो जावो, घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती आहे. कोरोनाची परिस्थिती मात्र हाताबाहेर गेली आहे. अशा मोकाट फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी थांबवून त्यांची थेट अँटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
बाहेर पडणे सोपे जावे म्हणून अनेकांनी बोगस कार्डे तयार केली आहेत. आपल्या वाहनांवर दूध संस्थेचे स्टिकर लावून अत्यावश्यक सेवेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे लोक संगणकाचा वापर करून बोगस ओळखपत्र बनवून खुलेआम फिरत आहेत. या फिरणाऱ्या लोकांच्या घरात कोरोना रुग्ण असल्याने ते अनेकांना बाधित करीत आहेत. यामुळे अशी बोगस ओळखपत्रे तयार करणारे व वापरणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत व अशा मोकाट फिरणाऱ्या लोकांची कोविड टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी फलटणमध्ये होत आहे.
चौकट
बाधितांच्या नातेवाईकांची शतपावली
अनेक भागात स्वत: किंवा घरातील कोणी कोरोनाबाधित असला तरी, रात्रीच्या वेळेस गुपचूप बाहेर पडून चकरा मारण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्यांच्या घरात कोरोना रुग्ण असेल, अशांच्या घरावर स्टिकर लावणे तसेच बाहेर पडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.