बाळासाहेब रोडेसणबूर : जादा सोन्याचे आमिष दाखवून महिलेकडील खरे दागिने घेऊन त्या बदल्यात तिला खोटे दागिने देऊन लुबाडल्याची घटना ढेबेवाडी येथील आठवडा बाजारात घडली. ढेबेवाडी पोलिसात या घटनेची नोंद झाली असून दोघांवर पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील पानेरी येथील पारुबाई संपत पवार (वय ५०) ह्या बुधवारी आठवडा बाजाराला आल्या होत्या. यावेळी एका अनोळखी महिलेने त्यांच्याजवळ येऊन येथे सरकारी दवाखाना कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर पारुबाई यांनी दवाखान्याकडे जाणारा रस्ता त्यांना दाखविला. त्यावर तेथून निघून न जाता त्या महिलेने तुमच्याकडे काम आहे, बाजूला चला असे सांगून त्यांना बाजारतळा नजीकच असलेल्या बोळात नेले. त्याचवेळी तिथे एक अनोळखी व्यक्ती आला.संबंधित महिलेने पारुबाई यांना सोन्यासारखा दिसणारा एक दागिना दाखवला व ‘हा जास्त वजनाचा आहे तो तुला घे व तुझ्याकडील दागिने मला दे,’ असे सांगितले. त्यावर पारुबाई यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील कुड्या काढून त्या महिलेला दिल्या. तसेच तिच्याकडील दागिना स्वतःला घेतला. त्यानंतर ती महिला व पुरुष दोघेही तेथून निघून गेले. मात्र थोड्या वेळाने शंका आल्याने पारुबाई यांनी दागिन्याची खात्री केली असता तो खोटा असल्याचे समोर आले.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Satara Crime: जादा सोन्याचे आमिष, खरे दागिने घेऊन बदल्यात दिले खोटे दागिने; ढेबेवाडीतील बाजारात महिलेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 4:53 PM