सातारा : ‘अॅट्रॉसिटी हा कायदा मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले हे कवच असून, हा कायदा रद्द झाल्यास मागासवर्गीयांवर अत्याचार वाढतील. याचा गैरवापर होतो हे मान्य असून, खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वेगळा कायदा निर्माण करावा,’ अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, अनुसूचित जाती व जमातींसाठी असलेल्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी दि. १४ नोव्हेंबरला मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक लागल्याने आचारसंहिता जारी झाली आहे. आचारसंहितेत मोर्चा काढता येत नसल्याने मोर्चासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे रितसर अशी परवानगी मागण्यात आली आहे.गायकवाड म्हणाले, हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या अथवा जाती-धर्माच्या विरोधात नसून बहुजनांच्या समस्यांसाठी आहे. यासाठी विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, तालुकास्तरीय कमिट्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तर संयोजन समिती तयार करण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्ह्यातील दोन ते अडीच लाख लोक यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज आहे.मोर्चाच्या तयारीासाठी ग्रामीण भागात जोरात तयारी सुरू आहे. हा मोर्चा पक्षविरहित असून, आपण व कार्यकर्ते एक बहुजन म्हणून मोर्चात सामील होणार आहे, असेही यावेळी अशोक गायकवाड म्हणाले. (प्रतिनिधी)
खोट्या तक्रारी देणाऱ्यांना शिक्षेसाठी वेगळा कायदा करा
By admin | Published: October 18, 2016 10:34 PM