सातारा : ‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने साताऱ्यासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत व्हॉट्सॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत, हा संदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला नसून यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या संदेशामध्ये दैनंदिन जीवनावश्यक वस्तू हाताळणीसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. अशी कोणतीही माहिती वा संदेश सातारा जिल्हा माहिती कार्यालयाकडून काढण्यात आलेला नाही. हा संदेश खोटा असून, अशा बनावट मेसेजमधील आवाहनाला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे.
अशा आपत्तीच्या काळात लोकांची दिशाभूल होईल असा कोणताही मजकूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव टाकून खोडसाळपणे पसरविणाऱ्या संबंधितावर यापुढे कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
शेजारी जाणे बंद, ब्रेड-पाव, बेकरी सामान बंद, बाहेरील व्यक्ती घरकामासाठी घेऊ नये. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुऊन घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुवा. वृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रेमध्ये चोवीस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा. पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरेसाठीपण वर दिल्याप्रमाणेच करा. जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना ‘भरपगारी’ सुट्टी देऊन टाका. पुढील पंधरा-वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा. झोमॅटो, स्विग्गी अजिबात बंद करा. अशी मनघडण माहिती या संदेशात दिली असून, ही माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांच्या नावाने खपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या खोट्या संदेशावर काही लोक विश्वास ठेवत असल्याने समाजामध्ये गैरसमज पसरत आहे. नागरिकांनी वृत्तपत्रे, अधिकृत न्यूज चॅनल्स यावर देण्यात आलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा इतर समाजमाध्यमांतून येणाऱ्या कुठल्याही फुटकळ माहितीवर विश्वास न ठेवता प्रशासनाने केलेल्या अधिकृत आदेशानुसारच कोणताही निर्णय घ्यावा. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच जे कोणी अशा पद्धतीने खोटी माहिती पसरवत असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.