लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : कोरोना संसर्गजन्य आजाराने मृत्यू झालेल्या प्रतापराव माने (निमसोड) व अरविंद वायदंडे (भोसरे) या दोन पत्रकारांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी खटाव तालुका पत्रकार संघटनेच्यावतीने करण्यात आली. याबाबत तहसीलदार किरण जमदाडे यांना दिलेल्या निवेदनातील माहितीनुसार, ज्येष्ठ पत्रकार प्रतापराव परशुराम माने (वय ५८) यांचे दि. २ मे २०२१ रोजी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले, तर भोसरे येथील पत्रकार अरविंद शंकर वायदंडे (वय ४१) यांचेही सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना दि. १५ मे २०२१ रोजी निधन झाले. पत्रकार वायदंडे यांचे वडील शंकर बाळू वायदंडे यांचेदेखील काही दिवसांपूर्वी त्याठिकाणीच निधन झाले आहे. वायदंडे यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. दोन्ही पत्रकारांचे कोरोना संसर्गाने आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. तसेच कुटुंबीयांचीदेखील आर्थिक परवड होत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासनाच्यावतीने आर्थिक मदत करावी, तसेच शासनाने कोरोना महामारीत मृत झालेल्या कोरोना योद्धा पत्रकारांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. या घोषणेचीही अंमलबजावणी व्हावी. यावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागार, शेखर जाधव, आयाज मुल्ला, संजय देशमुख, मुन्ना मुल्ला, नितीन राऊत, पद्मनिल कणसे, धनंजय चिंचकर, केदार जोशी, समीर तांबोळी, शरद कदम, विनोद खाडे, बाबा शिंदे, महेश गिजरे, आकाश यादव, विजय जगदाळे, विनोद लोहार आदी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी जनार्दन कासार यांना देण्यात आल्या आहेत.
चौकट :
पत्रकारांना तातडीने लस देण्याची मागणी
खटाव तालुक्यातील सर्वच पत्रकार फ्रंटलाईन वर्कर म्हणून नागरिकांत कोरोना विरोधात जनजागृतीचे काम करीत आहेत. तरी सर्व पत्रकारांनाही तातडीने कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
---------------------------------------