सातारा : शेतीच्या वादातून फलटण तालुक्यातील खामगाव कोंडेवस्तीमधील गावगुंड दमदाटी करत आहेत, त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने सावळकर कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करण्यासाठी बसले आहे.
याप्रकरणी बबन बाळू सावळकर (वय ६०) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते स्वत: व त्यांच्या कुटुंबातील १२ सदस्य असे मिळून खामगाव कोंडे वस्ती, ता. फलटण, जि. सातारा येथे शेतजमीन गट नंबर ५३७ मध्ये घर बांधून राहत आहेत. त्यांच्या शेजारी गट ५३६ जमीन आहे. त्या जमिनीचे मूळ मालक मनोहर अनाप्पा कलात राहणार साखरवाडी असे आहे. हा गट नंबर ५३६ जमीन एक कुटुंबीय सहा वर्षांपासून करत आहेत. जमीन मशागत करत असताना संबंधित कुटुंबीयांनी जमिनीचा बांध फोडून कमी करून सावळकर यांच्या जमिनीत अतिक्रमण केले आहे.
याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सावळकर कुटुंबीयांतील सदस्यांना पाच वेळा मारहाण केली, याबाबत ३ ऑगस्ट २०१८ पासून सहा वेळा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय, साखरवाडी पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी तक्रारी अर्ज केले, समक्ष जाऊन फिर्यादी दाखल केल्या; परंतु संबंधित पोलीस यंत्रणेने न्याय मिळवून दिला नाही, उलट मारहाण करणाऱ्या कुटुंबीयांची बाजू घेतली.
संबंधित कुटुंबीय ॲट्रॉसिटीसारख्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असून, या प्रकारामुळे कुटुंबातील स्त्रिया, मुले व इतर लोक भयभीत आहेत. ६ जुलै रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एकाने घराच्या अंगणात येऊन सावळकर कुटुंबीयांना शिवीगाळ करून कोंडे वस्तीतून निघून न गेल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे कुटुंब भयभीत झाले आहे व माझा अगर कुटुंबातील सदस्यांचा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबत साखरवाडी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार देऊनदेखील दुर्लक्ष केले गेले असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाचा निर्णय घेतला आहे, असे सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.
फोटो नेम : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे खामगाव, ता. फलटण येथील अन्यायग्रस्त कुटुंब उपोषणाला बसले आहे. (छाया : जावेद खान)
फोटोनेम : १३जावेद०१