सूर्यकांत निंबाळकर -- आदर्की --‘नको दुरावा मनामध्ये, नको घराला गर्व धनाचा, लीन राहावे प्रभूचरणी’ या काव्याप्रमाणे महादेव मोहिते यांच्या कुटुंबात २५ सदस्य आहेत. थोरांपासून लहानांपर्यंत सर्वांना एकमेंकाबद्दल आदर आहे. आई-वडिलांची हलाखीची परिस्थितीत असताना पाच भावंडे पाच पांडवाप्रमाणे जीवनाशी संघर्ष करीत राहिले. या संघर्षाचे स्मरण ठेवून आजही मोहिते यांची चौथी पिढी एकत्र नांदत आहे. इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी।। महोदव मोहिते यांच्या रूपाने लावलेल्या रोपाचा वटवृक्षात रूपांतर झालेले पाहायला मिळाले. चार पिढ्या एकत्र ठेवण्याचे स्वप्न व प्रयत्न अंकुशराव मोहितेंनी लिलया पेलले आहे.थोरले बंधू अंकुशराव मोहिते शेती करतात. दुसरे बंधू दीपक कापड बाजार मुंबईत काम करत. भारतीय सैन्यदलात भरती झाले. तृतीय बंधू अशोक पुणे येथे नामवंत कंपनीत कामाला आहेत, तर चतुर्थ बंधू ह. भ. प. संजय यांचे निधन झाले. लहुराज मोहिते शेती करत आहे.आपुलीया हिता असे जो जागता। धन्य माता-पिता तयाचिया, साधू-संताचे सात्विक विचाराची ह. भ. प. बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या पद्स्पर्श मोहिते यांच्या घराला झाल्यापासून सर्वजण वैष्णव झालो. घरामध्ये आई राणीबाई, वहिनी निर्मला, छाया, संगीता, शीतल, विजया, मनीषा, सुषमा, काजल सुना. जगदीश, अतुल, अश्विन, सुहास, अक्षय, रेश्मा, मोहिनी, साक्षी, मयूर, गौरी, संचती, स्वरा, राजवीर, पुतणे आणि नातू असा परिवार आहे. घरामध्ये हालाखीची परिस्थिती असतानासुद्धा मुलांना शिक्षण देऊन त्यांना स्वत:चा पायावर उभे करण्याचे नेहमी बजावत आलो. अतुल डॉक्टर, अश्विन सॉफ्टवेअर इंजिनिअर, सुहास मॅकॅनिकल इंजिनिअर, अक्षय मॅकॅनिकल इंजिनिअर आहेत.मोहिेते यांची १२ एकर शेती पूर्ण रानवड, माळरान होती. त्यामध्ये काही पिकत नव्हते; पण मनाला जिद्द आणि चिकाटी ठेवून शेती पूर्ण बागायत करत त्यामध्ये ऊस, कांदा, टोमॅटो, भेंडी, वांगी, भोपळा, मिरची असे नवनवीन पिके घेऊन विक्रमी उत्पादन काढले आहे. भूमातेच्या सेवेत सर्व कुटुंब सतत झटत आहे.आज या कुटुंबाचा आधारवड ८० वर्षांचा झाला आहे. जीवनात आर्थिक, सुख-दु:खावर मात करत सर्वजण गुण्यागोविंदाने विनातक्रार एका छताखाली राहत आहेत. मुळीकवाडी गावातील प्रत्येकाला मोहिते यांच्या या घराविषयी आपुलकी आहे.कुटुंबातील जिव्हाळा महत्त्वाचा!कुटुंबातील पे्रम, जिव्हाळा, आत्मीयता या सर्व गुणाचा परिबोध एकत्रित कुटुंबातच होतो. हम दो, हमारे दो, मै और मेरी बीबी ही संकुचित विचारच समाजाला दु:खाला कारणीभूत असावेत, म्हणून घरात सात्विक विचार असावेत. कधी ही काही कमी पडू देत नाहीत ही शिकवण मोहते यांच्या पिढीत चांगलीच भिनली आहे. त्यामुळे घरात येणाऱ्या आणि लग्न करून जाणाऱ्या मुलीही हेच शिकतात. घरात कोणताही सणसमारंभ सर्वांच्या एकत्रीत येण्याशिवाय पूर्ण होत नाही. आठवडाभर चालणारी दिवाळी आणि त्यासाठी महिनाभर व्यस्त महिला ही मोहिते कुटूंबाची शान आहे. घरातील प्रत्येकाला विचारात घेवून निर्णय घेण्याच्या पध्दतीमुळे परस्परांमधील विश्वास दृढ होत आहे. प्रत्येकावर हक्काने रागविण्याचा आणि प्रेम करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पसारा झाला म्हणून आई ओरडली तर मुलांच्ी बाजू घेवून त्यांना पदराखाली घेण्यासाठी आजी आणि काकु सक्रिय असतात.
आर्थिक संकटाशी झुंजत जपला कौटुंबिक एकोपा
By admin | Published: March 29, 2016 10:12 PM