सातारा : एक काळ असा होता, जेव्हा कोरोनाबाधित व्यक्तीच्या अगदी पन्नास फूट अंतरावर उभं राहणंही अनेकांना जोखमीचंं वाटत होतं. मात्र, सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही जोखीम पत्करली अन् कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करून आपले दायित्वही पूर्ण केले. सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतल्याने कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ही माणसं अन् त्यांचं कुटुंब मात्र कोरोनापासून आजही चार हात लांब आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पालिकेची आरोग्य यंत्रणा गेल्या वर्षभरापासून जीवतोड मेहन घेत आहे. एकीकडे या प्रयत्नांना यश मिळत असताना दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनाविरुद्धचा लढा अविरतपणे सुरूच आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्या पहिल्या रुग्णावर साताऱ्यातील संगममाहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हापासून सर्वच मृतांवर संगममाहुलीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून ही जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपविण्यात आली. मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम अत्यंत जोखमीचे होते. मात्र, आरोग्य कर्मचारी मृतांचे पालकत्व स्वीकारून आपले दायित्व पूर्ण केले व आजही करत आहेत.
पालिकेचे आठ कर्मचारी गेल्या वर्षभरापासून कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांनी २००० मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण दगावल्यानंतर प्रथम मृतदेह निर्जंतुक केला जातो. यानंतर तो सील म्हणजेच हवाबंंद करून अंत्यसंस्कारासाठी नेला जातो. मृतदेह रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत आल्यानंतर पीपीई किट, फेस शिल्ड, हॅण्डग्लोज, मास्क आदी सुरक्षेची साधनं परिधान करून कर्मचारी मृतांवर अंत्यसंस्कार करतात. अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमी सोडियम हायपोक्लोराइडद्वारे निर्जंतुक केली जाते. कर्मचाऱ्यांकडून घरी जाण्यापूर्वी देखील सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जाते. यामुळेच कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ही जिवंत माणसं आजही कोरोनापासून दूर आहेत, हे विशेष.
(पॉइंटर्स)
शहरातील स्मशानभूमी २
मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांची संंख्या ८
आतापर्यंत कोरोनाबाधित १
(कोट)
कोरोनामुळे दगावणाऱ्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम अत्यंत जोखमीचे होते. सुरुवातीला थोडी भीती वाटली; परंतु आरोग्य अधिकारी व प्रशासनाने आमच्या सुरक्षेत कोणतीही कसर सोडली नाही. सुरक्षेची सर्व साधनं वेळोवेळी मिळत गेली. त्यामुळे आम्ही मोठ्या हिमतीने मृतांवर अंत्यसंस्कार करू शकलो.
- संदीप पाटसुते, आरोग्य मुकादम
(कोट)
मृतदेह ताब्यात घेतल्यापासून अंत्यसंस्कार करेपर्यंत आम्ही स्वत:च्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतो. प्रारंभी हे काम करताना भीती वाटली; मात्र त्यांनतर सवय होत गेली. अंत्यसंस्कार करून घरी परतल्यानंतरही आम्ही कपडे निर्जंतुक करतो. अंघोळ करतो. मगच घरात जातो. त्यामुळे आज आम्ही व कुटुंब कोरोनापासून दूर आहोत.
- लक्ष्मण कांबळे, कर्मचारी
(कोट)
पालिका प्रशासनाने आमच्या खांद्यावर अंत्यसंस्काराची जबाबदारी सोपवली. आम्ही आठ कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले काम जबाबदारीने व सुरक्षितरीत्या पूर्ण करीत आहोत. नागरिकांनी देखील स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सचे पालन करायला हवे.
- कपिल मट्टू, कर्मचारी
फोटो : १५ संदीप पाटसुते/ १५ लक्ष्मण कांबळे/ १५ कपिल मट्टू
फोटो : १५ संगममाहुली अंत्यसंस्कार
डमी : १४ सचिन डमी