वाई : शहरामध्ये कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला १३५ वर्षे जुना पूल आज पाडण्यात आला. आज सकाळपासून जेसीबीच्या साह्याने ह्या पुलाचे बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली. याठिकाणी आता नवीन प्रशस्त पूल तयार होत असल्यामुळे वाईकरांमध्ये आनंद असला तरी या जुन्या पुलाच्या आठवणीने नागरिक भावूक झाले आहेत. गेली अनेक वर्षे या जुन्या पुलाने वाईकरांना खंबीर साथ दिली, त्याच ब्रिटिशकालीन पुलाला आज वाईकरांनी निरोप दिला.
हा पूल पाडण्यात येणार असल्याने वाईकरांनी शेवटची आठवण म्हणून अनेकांनी काही दिवसापुर्वीच पुलावर उभे राहून फोटो काढून घेतले. तर, पुलाच्या निघणाऱ्या घडीव दगडी कृष्णा नदीवरील घाट संवर्धनला वापरावे, अशी ही मागणी करण्यात आली.वाई शहराच्या उत्तर- दक्षिण भागास जोडणारा मुख्य पुल म्हणून ज्याची ओळख आहे, असा किसनवीर या मुख्य चौकास जाडणारा ब्रिटिशकालीन पूल आहे. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला पूल हा १८८४ साली ब्रिटिशांच्या राजवटीत बांधण्यात आला आहे. या पुलाला १३५ वर्षे पूर्ण झाली. दरम्यान पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानतंर १९८४ साली ब्रिटिश शासनाने महाराष्ट्र शासन व नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्याबाबतीत पत्र पाठविण्यात आले होते. या पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे उगवली होती. गेली अनेक वर्षे एक नवीन सक्षम पुलाची मागणी केली जात होती.
दोन्ही भागांना जोडणारा सक्षम पर्याय नसल्याने व नागरिकांच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नवीन पुलाचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता. पुलाचे शहराच्या दृष्टीने महत्व ओळखून शासनाने पुलाला मंजुरी देऊन नवीन तंत्रज्ञानाने युक्त १५ कोटीचा आराखडा असणारा नवीन पूल मंजूर केला. त्यामुळे लवकच हा नवा पूल दळणवळणासाठी खुला होणार आहे.