पिंपोडे बुद्रुक : परिसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर भर लोकवस्तीतील अवैध धंदे सर्वसामान्यांच्या जीवनात अडचणीचे ठरत आहेत. जबरी चोरी अन् गुन्ह्यांमधील आरोपी पकडणाऱ्या पोलिसांपुढे या भुरट्या चोरांनी अन् अवैध धंद्यांनी मात्र आव्हान उभे केल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे. अट्टल गुन्हेगारांना शोधणाऱ्या पोलिसांनी या भुरट्या चोरांपुढे शरणागती पत्करल्यासारखी परिस्थिती आहे. या चोरांनी विशेषत: शेती अवजारांना लक्ष्य केले असून, हजार दोन हजार रुपयांच्या चोरीची तक्रार देऊन पोलिसांचे कटकट मागे नको म्हणून नुकसान होऊनही तक्रारी देण्यास शेतकरी पुढे येत नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, यामुळे चोऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. विहिरींवरील कृषिपंप, पी. व्ही. सी. पाईप, ठिबक सिंचन साहित्य, केबल यासारख्या वस्तूंचे चोरीस जाण्याचे प्रमाण जास्त आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड...शेतातील साहित्य चोरीस गेल्यामुळे अनेकदा कामे करताना शेतकरी अडचणीत येतो. परिणामी पिकांच्या नुकसानीबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसते. सोळशी, नायगाव, रणदुल्लाबाद, नांदवळ, सोनके, पिंपोडे गावांसह परिसरात या घटना घडत असल्यामुळे पोलिसांनी रात्रगस्त घालून कोणाचाही विचार न करता कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शेती अवजारे, कृषिपंपावर चोरट्यांचा डोळा
By admin | Published: December 23, 2014 9:10 PM