सातारा : शिवथर, ता. सातारा येथील सचिन मदन साबळे (वय ४२) या शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन साबळे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी विविध बँकाचे सुमारे पाच लाखांचे कर्ज घेतले होते. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी घरातच छोटेसे किराणा दुकान सुरू केले होते. मात्र, यातूनही त्यांचा घर खर्च भागत नव्हता. तसेच बँकेचे हप्तेही वेळेत जात नव्हते. त्यांची मुलेही शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत.
कर्जाच्या विवंचनामुळे ते नेहमी तणावाखाली राहत होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. यावेळी त्यांनी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार त्यांच्या पुतण्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.