सणबूर : वांग मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात असूनही येथील शेतकऱ्यांना गेल्या सतरा वर्षांच्या कालावधीत धरणाच्या पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही़ धरण एकीकडे आणि लाभक्षेत्र दुसरीकडे असल्याने या शेतकऱ्यांना शासन कसे पाणी देणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे़परिसरातील मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, शितपवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काढून घेतल्या, मात्र त्यांना भरपाई मिळालेली नाही़ मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना नेमके कसे पाणी दिले जाणार? याबाबत कुणीही ठोसपणे सांगायला तयार नसल्याने शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनी संपादीत करून सतरा वर्षे उलटून गेली़ तरीही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही़ शासनाने या गावातील शेतकऱ्यांना पाणी कसे देणार ते जाहीर करावे़ नाही तर घेतलेल्या जमिनी मुळ शेतकऱ्यांना परत द्याव्यात अशा मागणीने जोर धरला आहे़ १९९७ पासून या धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली़ तेव्हापासूनच हे धरण संघर्षात सापडले आहे़ कधी निधीचा तुटवडा तर कधी धरणग्रस्तांची आंदोलने यामुळे धरणाचे काम सातत्याने रखडत गेले़ सध्या धरणात काही प्रमाणात पाणी साठवण्यात आले असले तरी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यासाठी अजूनही धरणाचे बरेच काम बाकी आहे़ शासनाने चार एकरांचा स्लॅब लागू करून त्यावरील जमिनी पुनर्वसनासाठी ताब्यात घेतल्या़ एकत्र कुटुंब असलेल्या आणि खातेफोड न झालेल्या अनेक शेतकऱ्यांवर यामुळे अन्याय झाला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ तर काहींनी आपल्या जमिनीला पाणी मिळेल, या आशेने जमिनी दिल्या आहेत़ मात्र, सतरा वर्षे उलटूनही याठिकाणी पाणी पोहोचले नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे़ (वार्ताहर)
लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित
By admin | Published: September 09, 2014 10:46 PM