आॅनलाइन लोकमत
कोपर्डे हवेली (सातारा), दि. 28 - उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीला पाणी जास्त लागत आहे. त्यातच वीजवितरण कंपनीकडून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतक-यांतून संताप व्यक्त होत असून, शुक्रवारी कोपर्डे हवेली व पार्लेतील शेतक-यांनी अखंडित विजेसाठी गनिमी कावा करीत दोन्ही गावांचा वीजपुरवठाच खंडित केला. त्यामुळे वीज अधिका-यांसह कर्मचा-यांचीही चांगलीच धावपळ झाली.
कोपर्डे हवेली शिवारातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो. तो लगेच पूर्ववत होत नाही. विजेचा खंडित कालावधी वाढवून दिला जात नाही. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. कृषिपंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा त्रास पार्ले, कोपर्डे हवेली, नडशी आदी गावांतील शेतक-यांना होत आहे. कोपर्डे हवेली गावात ७५० कृषिपंप असून, सुमारे साठ ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र, सेवा देण्यासाठी दोनच कर्मचारी आहेत. त्यामुळे तांत्रिक बिघाड लवकर निघत नाही. त्यासाठी पाच कर्मचारी मिळावेत. तसेच परिसरात वीजवाहक तारा लोंबकळत आहेत. अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे. यासाठी ओगलेवाडी येथे जाऊन आंदोलन करण्याचा इशारा शेतक-यांनी दिला होता. मात्र, प्रत्यक्षात शुक्रवारी ओगलेवाडीला गेलेच नाहीत.
शेकडो संतप्त शेतकरी शुक्रवारी सकाळी कोपर्डे हवेली गावच्या शिवारात पोहोचले. तेथे नागोबाच्या मंदिराशेजारी कोपर्डे हवेली, नडशी व पार्ले येथे वीजपुरवठा करणारा मुख्य ट्रान्सफॉर्मर आहे. शेतक-यांनी हा ट्रान्सफॉर्मरच बंद केला. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचा-यांनी त्याची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना आंदोलनाची माहिती मिळाली. काही वेळातच वीज अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. शेतक-यांनी त्याचठिकाणी अधिका-यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तसेच मागण्यांचे निवेदन अतिरिक्त कार्यकारी अभियांता एम. एस. तपासे, कनिष्ठ अभियंता यादव यांना दिले. यावेळी भास्करराव चव्हाण, गणेश चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती बुधे, माजी सरपंच लालासाहेब चव्हाण, पार्लेचे माजी सरपंच राहुल पाटील, राजेंद्र नलवडे-पाटील, महेश नलवडे, महादेव चव्हाण, धैर्यशील पाटील, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते.