वाठार निंबाळकर : वाठार निंबाळकर, ताथवडे परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी पोलीस विभागाचा वचक संपला आहे का काय? असा प्रश्न विचारत आहेत.
याबाबतीत माहिती अशी की, वाठार निंबाळकर येथील दहा दिवसांपूर्वी विजेचा चिंतामणी विद्युत ट्रान्सफार्मर या शंभर केव्हीए ट्रान्सफार्मरची चोरी करण्यात आली. लगतच्या दोन विहिरींवरील मोटारीची चोरी झाली आहे. या चोरीनंतर दोनच दिवसांत ताथवडे परिसरातील शिंदे विद्युत ट्रान्सफार्मर शंभर केव्हीए या डीपीची चोरी झाली. लगतच्या विहिरींवरील एक विद्युत पंपाची चोरी करण्यात आली.
सत्यवान शिंदे यांच्या विहिरीवरील तीन विद्युतपंप चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मोटरी न निघाल्याने मोटारीची तोडामोड करण्यात आली. दोन्ही चोरीला गेलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरवर सुमारे शंभरहून अधिक विहिरींवरील मोटारींना वीजपुरवठा होत होता. मात्र विद्युत ट्रान्सफार्मर चोरीला झाल्याने विजेअभावी पिकांना पाणी न देता आल्याने सर्व शेतकऱ्यांना पाण्याअभावी पिकाचे नुकसान होताना पाहून डोळे पाणावत आहेत. विद्युत ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी सहायक अभियंता एस. ए. कुंभार यांच्यांशी संपर्क साधला असता तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत ट्रान्सफार्मर चोरीला गेलेले असल्याने नवीन डीपीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. विद्युत ट्रान्सफार्मर उपलब्ध होण्यासाठी वेळ लागला जातो आहे, अशी माहिती दिली.
चौकट :
शेतकरी अडचणीत
कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असून, त्यात विजेअभावी पिके जळून जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे ,तालुक्यातील पोलिसांनी रात्र गस्त घालून या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ताथवडे येथील शेतकरी गणपतराव वाघ यांनी केली आहे.