मलकापूर : कऱ्हाड, मलकापूरसह परिसरात मागील काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे एका बाजूला शेतकऱ्यांना अतिपावसाचा सामना करावा लागला आहे, तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून पेरलेल्या पिकांचे जतन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा पद्धतीने सर्वांचा पोशिंदा मात्र दुहेरी संकटात सापडला आहे.
कऱ्हाड तालुक्यात पाच दिवसांपूर्वी काही भागाला दररोजच सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील बहुतांशी शेतात पाणी साचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणीसह टोकणीची कामे खोळंबली आहेत. तर काही शेतकऱ्यांनी टोकणी केली. मात्र, दलदल असल्यामुळे अंतर्गत मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.
मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगाव परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले ही वेलवर्गीय व गवारसारख्या शेंगवर्गीय भाजीपाला घेतला जातो. सध्या ढगाळ वातावरण व धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत आहे.
दरम्यान, कऱ्हाड तालुक्यात आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे रानात पाणी साचल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे.
\\\\\\\\\\\\\\\\\\\