किडगाव : सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. तर पश्चिमेकडील तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे चेहरे सुकले आहेत.पावसाने ओढ दिल्याने किडगाव, ता. सातारा परिसरातील नेले, वर्ये, धावडशी, पिंपळवाडी, कण्हेर, वेळेकामथी येथील पेरणी झालेली पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.सोयाबीन, भुईमूग, कडधान्य या पिकांची पेरणी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी केली गेली होती; मात्र पेरणी झाल्यापासून एकदाही पाऊस नसल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. दोन दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार परेणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे आहे.पिकांना पाणी द्यावे तर कण्हेर धरणाच्या कालव्याचे पाणी व्यवस्थापनाने बंद केले आहे. कण्हेर धरणात फक्त १६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने कॅनॉलला पाणी सोडता येत नाही. विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. त्यामुळे पेरणी झालेली पिके येणाऱ्या पावसाची वाट पाहत आहेत. या भागात नेहमी चांगला पाऊस होत असतो. यावर्षी उसाची लागवड ही शेतकऱ्यांनी केली असून, शेतकऱ्यांबरोबर चातक पक्ष्याचाही घसा कोरडा पडला आहे. (वार्ताहर)नदीपात्र अजूनही कोरडेचजुलै महिना उजाडला तरीही पावसाने ओढ दिल्याने नदीपात्र आणि ओढे अजूनही कोरडेच पडले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. भुरभुरणाऱ्या पावसापेक्षा आता सर्वांनाच प्रतिक्षा धो धो पडणाऱ्या पावसाची आहे.शेतकऱ्यांचे नुकसानच१९७२ नंतर एवढा मोठा दुष्काळ या भागाने प्रथमच अनुभवला आहे. चातकाबरोबर शेतकऱ्यांनाही ‘ये रे ये रे पावसा..’ म्हणण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांत पाऊस न आल्यास पिके वाळून जाणार. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. - सयाजी इंगवले, प्रगतशील शेतकरी
किडगाव परिसरातील शेतकऱ्यांचे चेहरे सुकले
By admin | Published: July 01, 2016 10:57 PM