पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या प्रयोगांमुळे उत्पादकतेत वाढ होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत त्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल वाढते. त्यामुळे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा आयोजित केली जाते.
या स्पर्धेत कुंभारगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी सहभाग घेत, रब्बी हंगामात आपल्या अडीच एकर शेतात ज्वारीचे पीक घेतले. योग्य व्यवस्थापन करीत हेक्टरी ५६ क्विंटल ७५ किलो उत्पन्न मिळवत पाटण तालुक्यात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तसेच जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला.
दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने विविध प्रयोग शेतात राबविल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. कोणत्याही पिकाच्या लागवडीचा, पेरणीचा कालावधी महत्त्वाचा असतो. योग्य नियोजन आणि सल्ला घेतला, तर प्रत्येक जण भरघोस उत्पादन घेऊ शकतो, असे मत राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
फोटो : २०केआरडी०१
कॅप्शन : कुंभारगाव, ता.पाटण येथील राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याने पीकस्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.