सातारा : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यावर आरोप करण्यासाठी सुपाऱ्या दिल्या जात आहेत. सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद मिळण्यासाठी शेट्टी गप्प आहे, आंदोलन करत नाहीत, असा आरोप सुपारी घेणारी मंडळी करत आहे,’ असा खळबळजनक आरोप वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी प्रमाणे एकरकमी दर देण्यात यावा, ही रक्कम १४ दिवसांत जमा झाली पाहिजे. एफआरपी प्रमाणे ज्या कारखान्यांनी दिले नाहीत, त्यांचे अध्यक्ष व संचालक मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जावी, या मागण्यांसाठी दि. ६ नोव्हेंबर रोजी जयसिंगपुरात ऊस परिषद होणार आहे. याची माहिती देण्यासाठी तूपकर साताऱ्यात आले होते. ‘शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळण्याच्या हेतूने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभारलेल्या आंदोलनामुळे दर चांगला मिळू लागला. ५०० रुपये टनाला याप्रमाणे मिळणारा दर आता २७०० प्रती टनावर जाऊन पोहोचला; मात्र काहीजण सुपाऱ्या घेऊन शेट्टींविरोधात आरोप करत आहेत. वास्तविक टीका करणाऱ्यांच्या पाठीशी किती शेतकरी आहेत, हे त्यांनी तपासावे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिपदाचा हव्यास नाही. जयसिंगपुरातील ऊस परिषदेनंतर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे मागील फरक शेतकऱ्यांना द्यावा, या मागणीसाठी साताऱ्यात स्वाभिमानी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच एफआरपीच्या दरासाठी राज्यभरातून शेतकऱ्यांची पत्रे घेतली जात आहेत.’ यावेळी संघटनेचे प्रवक्ते संजय भगत, शंकर शिंदे, मयूर बोर्डे, ज्ञानेश्वर कदम व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राजू शेट्टींवर आरोप करण्यासाठी सुपाऱ्या!
By admin | Published: October 18, 2015 12:23 AM