सातारा : सातारा एमआयडीसीच्या चौथ्या टप्प्यासाठी निगडी, वर्णे, देवकरवाडी, राजेवाडी गावांच्या जमिनी संपादित करण्याला शेतकऱ्यांनी विरोध केला असून देगाव फाटा येथे रास्ता रोको केला. तसेच जमिनी देणार नाही असा पवित्राही घेतला. यामुळे तणावाचे वातावरण झाले. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोबाईलवरुन संपर्क साधनू १५ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.याबाबत शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारा आैद्योगिक वसाहतीचा चाैथा टप्पा सुरू होणार आहे. यासाठी जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. यासाठी सातारा तालुक्यातील निगडी तर्फ सातारा, वर्णे, देवकरवाडी, राजेवाडीतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत. तसेच याबाबत शेतकऱ्यांनी २०१३ पासून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकतीही घेतल्या आहेत. तरीही यावरती कोणताही निर्णय झालेला नाही.तसेच यावर्षी १४ जुलैलाही निगडी, धनगरवाडी, वर्णे, जाधववाडी आणि राजेवाडी गावातील पीडित शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिलेले. मात्र, आतापर्यंत त्यावर काहीही निर्णय झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रशासनाबद्दल तीव्र रोष निर्माण झाला आहे. यासाठी बुधवारी सातारा शहराजवळील देगाव फाटा येथे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला.
सकाळी साडे दहाच्या सुमारास शेतकरी जमा झाले. त्यानंतर त्यांनी देगाव फाट्यावर रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जमीन आमच्या हक्काची आहे. त्यामुळे आम्ही देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. तसेच त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यातच बराचवेळ रास्तारोको केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या बाजुने वळवावी लागली. या दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तुमच्या जमिनीचा प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले. तसेच याबाबत निर्णय न झाल्यास पुढील दिशा ठरविण्याचा इशाराही दिला आहे.या आंदोलनात भूमिपुत्र सेवाभावी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राहुल पवार, संजय पवार, जनार्दन पवार, जयसिंग काळंगे, राजेंद्र पवार, संतोष पवार, बळीराम वाघमोडे, आबासाे वाघमोडे, नाना देवकर यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता.
हातात फलक घेऊन वेधले लक्ष..देगाव फाटा येथील या रास्ता रोकोत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही आमच्या जमिनी देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यांच्या हातात ‘शेत जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, निगडी ग्रामस्थांचा एमआयडीसीला जाहीर विरोध, शिक्के हटवा-शेतकरी वाचवा, अशा आशयाचे फलक होते.