रेठरे बुद्रुक : ‘वर्धा आणि नाशिक जिल्ह्यांत आम्ही प्रायोगिक तत्त्वावर लोकांना घरबसल्या संगणकावर सातबारा काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता शेतकऱ्यांना सातबाऱ्यासाठी तलाठ्यामागे फिरावे लागणार नाही. महाराष्ट्रातील सर्व जमिनींची योग्य पद्धतीने मोजणी करून प्रत्येकाच्या हद्दी ठरवून देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे,’ असे मत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.भाजपच्या वतीने रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सहकारमहर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कृष्णा कारखान्याचे संचालक जगदीश जगताप, दयाराम पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, पांडुरंग होनमाने, डॉ. राजेंद्र पवार, सरपंच प्रविणा हिवरे आदी उपस्थित होते.मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत आम्ही अनेकांची दुकानदारी बंद केली असून, एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागातच चार ते पाच हजार कोटी वाचविले आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता भाजपा सरकारच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असून, याबाबत शरद पवार आणि नारायण राणेंनी आम्हाला शिकवायची गरज नाही. एकेकाळी भाजपाच्या मदतीमुळेच शरद पवार आणि नारायण राणेंना सत्ता मिळाली होती, हे त्यांनी ध्यानात ठेवावे.’ डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘विकासासाठी भाजपाशिवाय पर्याय नसून शेतकऱ्यांबद्दल आस्था असणाऱ्या या पक्षाचे नेते चंद्र्रकांत पाटील यांनीच ऊसदराची कोंडी फोडल्याने शेतकऱ्यांना एफआरपी व्यतिरिक्त १७५ रुपये जादा मिळू शकले. आज राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत.’याप्रसंगी डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, जगदीश जगताप, पैलवान आनंदराव मोहिते यांचीही भाषणे झाली. दरम्यान, कऱ्हाड काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा मधुमती पाटील यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसमवेत भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी व्ही. के. मोहिते, हणमंत धर्मे, घन:श्याम पेंढारकर, हणमंतराव जाधव, श्रीरंग देसाई, फत्तेसिंह जाधव, वसंतराव घोडके, मुकुंद चरेगावकर, यशवंत साळुंखे, बाबूराव यादव, जयवंत मोहिते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अतुल भोसलेंना राज्यात महत्त्वाचे पदयावेळी मंत्री पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांचा भावी आमदार असा उल्लेख करून, येत्या दीड महिन्यात अतुल भोसले यांना राज्यात महत्त्वाची जबाबदारी देण्याचा शब्द देत, कऱ्हाडकरांनी आत्तापासूनच निवडणुकीतील विजयोत्सव आणि अतुल भोसलेंंची भव्य मिरवणूक काढण्याच्या तयारीला लागावे, असे आवाहन केले
राज्यातील शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार सातबारा
By admin | Published: January 15, 2017 11:29 PM