लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : ‘जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन खरीपाची सभा घेणारी एकमेव जिल्हा परिषद म्हणून सातारा जिल्हा परिषदेस ओळखले जात आहे. कोणत्याही प्रकारचे शेतीतील प्रश्न, बियाणे, खते आदींच्या कमतरतेबाबत शेतकऱ्यांना समस्या असतील तर त्यांनी तत्काळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, तात्काळ त्यांना सहकार्य केले जाईल. यावर्षीच्या खरीप हंमागात जिल्हा परिषद पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल,’ अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. दरम्यान, यावेळी बियाणे खरेदीसाठी ५० हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली. कऱ्हाड तालुका कृषी विभागाच्या खरीप हंगामाची बैठक बुधवारी येथील बचत भवनमधील हॉलमध्ये पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद कृषी अधिकारी चांगदेव बागल, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, सभापती मनोज पवार, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती शालन माळी, उपसभापती रमेश देशमुख, सदस्य देवराज पाटील, सुरेखा पाटील, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, पंचायत समिती कृषी अधिकारी एस. एल. गोखले आदींसह ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडलाधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.यावेळी तालुका कृषी अधिकारी खरात यांनी कऱ्हाड तालुक्यातील पिकांची असलेली स्थिती, तालुक्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या योजना यांविषयी स्लाईड शो द्वारे माहिती दिली.कृषी विकास अधिकारी बागल म्हणाले, ‘यावर्षी खरीप हंगामाचा विचार करता शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना बियाणांचा दर्जा, किंमत व उगवण क्षमता तपासावी. जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आलेल्या गावांमध्ये पिकपद्धती घेणे गरजेचे आहे. कडधान्य उपादनात शेतकऱ्यांनी स्वत: नियोजन करावे. एक जूनपासून आधारकार्ड बँकेशी लिंक केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे खत शेतकऱ्यांना घेता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते खरेदी करण्यासाठी दुकानात जाताना स्वत:बरोबर आधारकार्ड घेऊन जावे. कऱ्हाड तालुक्यातील १३९ दुकानदार आतापर्यंत आधारकार्डशी निगडीत झाले आहेत. अजूनही एक हजार दुकानदार बाकी आहेत.’यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांनी हंगाम संपल्यानंतर शासनाकडून बियाणे दिली जातात. वास्तविक ती हंगामाच्या पूर्वी देण्यात यावीत जेणेकरून शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाचा व बियाणांचा उपयोग होईल असे सांगितले.गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी प्रास्ताविक केले. सहायक गटविकास अधिकारी देशमुख यांनी आभार मानले. खरिपाच्या बैठकीत पदाधिकारी ‘घामाघूम’कऱ्हाड तालुक्याची खरीप हंगामाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीस तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडलाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्यासह शासकीय अधिकारीही हजर होते. बैठक सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी व पदाधिकारी सारे चांगलेच घामाघुम झाले. कारण ज्या सभागृहात खरीप हंगामाची बैठक आयोजित केली होती. त्या सभागृहाची अवस्था अगोदरच दयनीय झाली असल्याने अधिकाऱ्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. पंचायत समिती प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा पुन्हा साक्षात्कार झाला. बियाणे खरेदीसाठी पन्नास हजार अनुदान...कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून पन्नास हजार रूपये अनुदानाची तरतुद केली असल्याची घोषणा बैठकीदरम्यान जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश पवार यांनी केली. बियाणे, खतांचा दर्जा उत्तम ठेवा अन्यथा कारवाई !शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरण्या करण्यासाठी लागणारे सोयाबीन, भूईमुग आदी बियाणे तसेच खतांचा दर्जा हा उत्तमप्रकारे दुकानदारांनी ठेवावा. अन्यथा कडक कारवाईस सामोरे जावे लागेल, अशा सूचना यावेळी कृषी सभापती रमेश पवार यांनी बैठकीस उपस्थित दुकानदारांना केल्या. उत्कृष्ट शेती करणाऱ्यांचा सत्कार... दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये हार न मानता उत्कृष्ट शेती करून पीकस्पर्धेत यश मिळविलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्जेराव जाधव, बाजीराव माने, दादासो माने, अनिल कणसे, क्षीतिज पाटील, अशोक गायकवाड, बजरंग दमाले आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पाठीशी...
By admin | Published: May 24, 2017 11:15 PM