पाचगणी (जि. सातारा) : शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरमध्ये फिरू नये, असा काय कायदा आहे काय? वेळेची बचत व्हावी, म्हणून सरकारी हेलिकॉप्टरने शेतात जातो, तेथे अधिकारी, पदाधिकारी, शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवतो. माझे पाय नेहमी जमिनीवर असतात आणि आपोआप शेतीकडे वळतात. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती काय वाईट आहे? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. पाचगणी, महाबळेश्वर येथील एमआरए सेंटरच्या सभागृहात आयोजित 'स्ट्रॉबेरी विथ सी. एम.' कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वसामान्यांची दुःखे, अडचणी जवळून पहिल्या आहेत. मी बघतो, करतो, हे माझ्या डिक्शनरीत नाही. मी मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात कसली हवा नाही. मी मुख्यमंत्री नाही तर कॉमन मॅन समजतो. लोकांना भेटणे हा माझा छंद आहे. घरात, मंत्रालयात बसून मी फेसबुक लाइव्ह करीत नाही, लोकांना थेट फेस करतो. शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, शेतावर जातो असे सांगितले.
स्ट्रॉबेरीपासून वाइननिर्मितीचा प्रकल्प महाबळेश्वर येथे उभारणारमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाबळेश्वर व जावळी हे डोंगरी तालुके आहेत. येथील नागरिक कामासाठी मुंबई येथे जातात. ते पुन्हा गावात यावेत, नोकरीच्या शोधार्थ शहरात जाणाऱ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत, यासाठी पर्यटन वाढीसाठी बरोबर रोजगार निर्मितीवर भर देत आहोत. येथील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे. बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर, इथेनॉल निर्मिती करता येते. बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्ट्रॉबेरीपासून वाइननिर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल.