सातारा : अलीकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यापेक्षा फॅशन म्हणूनच शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढतेय. सातारा जिल्ह्यात तब्बल १० हजार १९६ जणांकडे बंदूक परवाने आहेत. यावरूनच शस्त्राची फॅशन किती आहे, हे दिसून येते.
खरं तर बंदूक परवाना हा काही विशिष्ट कारणांसाठी दिला जातो. एखाद्याला दुसऱ्यापासून धोका आहे, असे वाटत असेल तर स्वसंरक्षणासाठी तो परवान्याची मागणी करू शकतो. त्याचबरोबर शेतीचे प्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठीही शस्त्र परवाना दिला जातो. ही प्रामुख्याने दोन कारणे शस्त्रांचा परवाना देण्यापाठीमागची असतात. मात्र, अनेक जण या दोन्ही कारणांचा वापर केवळ फॅशन म्हणून करतात. आपल्याकडे पिस्तूल आहे, हे समजण्यासाठी अनेक जण कमरेला पिस्तूल लावून समाजात फिरत असतात. यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल, अशी त्यांची समजूत असते. त्यामुळे शस्त्र परवान्यांसाठी दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. शस्त्र परवाना मिळण्याची प्रक्रिया किचकट असली तरी महिन्याला दहा ते पंधरा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. यामध्ये विशेषत: राजकारणी आणि उद्योजकांचा सर्वाधिक समावेश असतो. आतापर्यंत मिळालेल्या परवान्यांमध्येही याच लोकांचा समावेश आहे. जिल्ह्यात एवढे परवाने असले तरी अद्यापही परवाने घेण्यासाठी ओघ सुरूच आहे. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर अनेक जण शस्त्र परवाना घेत आहेत.
शस्त्र परवाना काढायचा कसा?
कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रतिज्ञापत्र, मेडिकल प्रमाणपत्र, पोलीस पाटील, तलाठी दाखला, पोलिसांकडून गुन्ह्यांची पडताळणी होते. जिल्हाधिकारी सुनावणी घेतात. खात्री झाल्यानंतरच परवाना मिळतो.
साताऱ्यात सर्वात जास्त; खंडाळ्यात सर्वात कमी
सातारा तालुक्यात सर्वाधिक २ हजार ३८० परवाने आहेत. त्यामध्ये सातारा शहरात तब्बल १ हजार ३९२ परवाने आहेत. आणखी परवाने मिळण्यासाठी साताऱ्यातूनच अर्ज दाखल झाले आहेत.
त्यामानाने सातारा तालुक्यात केवळ ९८८ परवाने आहेत. परंतु सातारा शहर परवाना घेण्यासाठी सर्वाधिक पुढे आहे. यात राजकीय आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.
खंडाळा तालुक्यामध्ये सर्वात कमी १५७ परवाने आहेत. त्याखालोखाल माण तालुक्याचा नंबर लागतो. या तालुक्यात २७४ परवाने आहेत. इथूनही आता मोठ्या प्रमाणात अर्ज येऊ लागले आहेत.
नियम कडक करण्याची आवश्यकता
परवाना मिळण्यासाठी असलेली प्रक्रिया किचकट असली तरी आणखी नियम कडक करणे गरजेचे आहे.
खरी गरज असेल त्यालाच परवाना मिळणे गरजेचे आहे. मात्र, अनेक जण फॅशन म्हणून परवाना घेत आहेत, यावर जरब हवी.
शस्त्र सांभाळणे कठीण
अनेकदा घरामध्ये काैटुंबिक वाद होतात. अशा वेळी रागाच्या भरात परवाना मिळालेल्या शस्त्राचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शस्त्र सांभाळणे कठीणच आहे.
जिल्ह्यात परवाना असलेल्या शस्त्राद्वारे एक घटना अनुचित घडली आहे. शिकारीला गेल्यानंतर चुकून एकाला गोळी लागली होती. मात्र, नंतर अशी घटना घडली नाही.
जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत, त्यांनी आपले शस्त्र नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा करावे लागते.