फलटण : शासन निर्णयानुसार पाणंद रस्ता खुला करून ग्रामस्थांना वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला सोमंथळी ग्रामपंचायत योग्य प्रतिसाद देत नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी गावातील शिवाजी धोंडीराम सोडमिसे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
सोमंथळी (ता. फलटण) येथील पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत स्तरावर गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालून सोमंथळी ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवाजी सोडमिसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, सोमंथळी येथील २३ फाटा ते बारामती - फलटण रस्ता (पोकळे वस्ती शाळा रस्ता) या पाणंद रस्त्यासाठी दोन वर्षे प्रयत्न करत आहे, असे शिवाजी सोडमिसे यांनी सांगितले.