उंब्रज : आपल्या विविध मागण्यासाठी उंब्रज पोस्ट कार्यालयात एका कर्मचाऱ्याने स्वत:च्या गळ्यात मडकं बांधून येथील पोस्ट कार्यालयातच आमरण उपोषण सुरू केले आहे.याबाबत माहिती अशी की, भारतीय पोस्टल एम्प्लॉईज असोसिएशनचे विभागीय सचिव महेश करचे यांनी उंब्रजच्या पोस्ट कार्यालयात सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
या संघटनेच्यावतीने कुटुंबीयांच्या व नातेवाइकांच्या हितासाठी पदाचा गैरवापर करणाऱ्या सहायक डाक अधीक्षक यांची केंद्रीय सतर्कता आयोगाकडून सखोल चौकशी करण्यात यावी, संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांना मिळणारी अपमानकारक व सावत्रपणाची वागणूक तत्काळ थांबवावी, दिव्यांग कर्मचारी कैलास पाटील यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, चाफळच्या पोस्टमास्तरांचे प्रलंबित घरभाडे तत्काळ अदा करावे, बदल्या व प्रतिनियुक्ती करताना काही कर्मचाऱ्यांना खास वागणूक व सर्वसामान्य कर्मचारी यांच्यावर होणारा घोर अन्याय थांबवावा, अशा प्रमुख मागण्यांसह ११ मागण्यांसाठी हे आमरण उपोषण करण्यात आले आहे.महेश करचे यांनी गळ्यात मडके बांधून दैनंदिन कामकाज केले. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू होती. दिवसभरातील कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर उशिरापर्यंत ते कार्यालयात काम करीत होते.