कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत असलेल्या टायर रिमोल्डिंग कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोटे गावच्या हद्दीत टायर रिमोल्डिंगचा कारखाना आहे. या कारखान्यात जुने टायर रिमोल्डिंगसाठी मोठ्या प्रमाणावर आणले जातात. या टायरचा एकाच ठिकाणी मोठा साठा केलेला असतो. शुक्रवारी मध्यरात्री अचानक या कारखान्याला आग लागली. ही घटना निदर्शनास येताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याबाबतची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर कऱ्हाडच्या अग्निशामक दलाला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.
आगीची भीषणता एवढी होती की, कित्येक किलोमीटरवरून आगीचे लोट आकाशात झेपावताना दिसून येत होते. अग्निशामक दलाने केलेल्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.