सातारा : कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून या पठाराला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ लागले आहेत. मात्र, पठाराबरोबरच कास धरणाला भेट देणारे काही हौशी पर्यटक धरणातील पाण्यात जीवघेणे स्टंट करु लागल्याने त्यांना आवारणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सातारा शहराला कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील पाणीसाठ्यात यंदा प्रथमच पूर्ण क्षमतेने वाढ करण्यात आल्याने धरण काठोकाठ भरले आहे. या धरणाचा परिसर नयनरम्य असल्याने पठारावर फुले पाहण्यासाठी येणारे बहुतांश पर्यटक धरणालादेखील भेट देत आहेत. मात्र, स्वत:च्या सुरक्षेची तमा न बाळगता धरणातील पाण्यात उभे राहून फोटोशन करणे, दंगा-मस्ती करणे, लहान मुलांना धरणाच्या काठावर, पाण्यात उभे करणे, असे प्रकार सातत्याने केले जात आहेत.वास्तविक धरणाच्या सभोवताचा परिसर हा मातीमुळे गुळगुळीत झाला आहे. सततच्या ओलाव्यामुळे येथील वाटा घसरट्या झाल्या आहेत. काठावरून चालताना चुकून जरी तोल गेला तरी एखादा पर्यटक पाण्यात पडू शकतो. येथे सुरक्षेची कोणतेही साधणे उपलब्ध नाहीत की सुरक्षारक्षक. धरणाच्या सभोवताली तात्पुरत्या स्वरुपात बॅरिकेडिंगदेखील करण्यात आलेले नाही. या गोष्टीची कल्पना असूनही पर्यटक धरणाच्या काठावर जीवघेणे स्टंट करताना दिसून येत आहेत. हा प्रकार गंभीर असून, अतिउत्साही पर्यटकांवर आवर घालणे गरजेचे बनले आहे.
साताऱ्यातील कास धरणावर पर्यटकांचा जीवघेणा स्टंट, धोक्याकडे दुर्लक्ष
By सचिन काकडे | Published: October 10, 2023 4:34 PM