शामगाव : पाचुंद, ता. कºहाड येथील बीएसएफ जवान विठ्ठल महादेव जाधव (वय २७) याचा पंजाब येथे सेवा बजावत असताना मृत्यू झाला. त्यामुळे पाचुंद गावावर शोककळा पसरली आहे.पाचुंद येथील जवान विठ्ठल जाधव गत तीन वर्षांपूर्वी बीएसएफमध्ये रुजू झाला होता. पाचुंद हे गावच दुर्गम भागात असल्यामुळे जवान विठ्ठल जाधव यांची परिस्थिती हलाखीची होती. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. आईने शेती व रोजगार करून मुले सांभाळली. विठ्ठलला एक मोठी बहीण आहे. गाव दुर्गम असून, गावास पिण्याचे पाणीही पुरेसे मिळत नाही. शेतीला पाणी नसल्याने येथे पावसावर शेती अवलंबून असते. विठ्ठल याने दहावीनंतर स्वत: रोजगार करून शिक्षण पूर्ण केले. माळरानावर व्यायाम करून बीएसएफमध्ये भरती झाला. त्यामुळे परिस्थिती थोडीशी बदलली. जुने पडके असलेले घर पाडून नवीन घर त्याने बांधले. आता हळूहळू प्रगती सुरू झाली. गत महिन्यात म्हणजे १८ एप्रिल रोजी त्याचा विवाह झाला. विवाहानंतर सर्व विधी उरकल्यावर सुटी संपल्यामुळे तो पुन्हा देशसेवेत हजर झाला. मात्र, विवाहाला पस्तीस दिवस झाले असताना वधूच्या हातावरची मेहंदीही सुकली नसताना आणि दारात घातलेला जांभळीच्या व आंब्याच्या फांद्यांचा मंडप अजूनही तसाच असताना विठ्ठलच्या मृत्यूची बातमी गुरुवारी पाचुंद गावात येऊन धडकली. त्यामुळे गावावर शोककळा पसरली.विठ्ठलचा मृत्यू गुरुवारी पहाटे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृत्यू नेमका कशामुळे झाला, काय घटना घडली? याबाबत अद्याप कसलीच ठोस माहिती कुटुंबीय आणि ग्रामस्थांना समजलेली नाही.
पाचुंदच्या जवानाचा पंजाबमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:56 PM