पुसेगाव (सातारा) : भाड्याने घेतलेल्या गाळा मालकाने पैशासाठी तगादा लावल्याने कोळकी नावाच्या शिवारातील स्वतःच्या विहिरीत बाप-लेकाने शनिवारी आत्महत्येसाठी उड्या घेतल्या. या घटनेत वडील बचावले असून, मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. अवधूत बाळकृष्ण कोळी (वय, २७), असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वडूज येथील शंकर किसन गोडसे व दत्तात्रय शंकर गोडसे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
बाळकृष्ण कोळी यांनी वडूज येथे भाड्याचे दुकान टाकण्यासाठी शंकर गोडसे व दत्तात्रय गोडसे यांच्याकडून दोन गाळे भाड्याने घेतले होते. अनामत म्हणून दीड लाख रुपये आणि दहा हजार रुपये दरमहिना भाडे देण्याचे ठरले. त्याप्रमाणे अनामत रक्कम देऊनही गोडसे दोघांनी करार करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर महिन्यातच पुन्हा एक लाख रुपयांची मागणी करत पुढच्या महिन्यापासून भाडे कमी द्या, असे सांगून एक लाख रुपये घेतले. एवढी रक्कम दिल्यानंतरही गोडसे यांनी आणखी ५० हजार रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. गोडसे याच्या त्रासाला कंटाळून बाळकृष्ण कोळी व मुलगा अवधूत यांनी आत्महत्या करायचे ठरविले.
दरम्यान, शनिवार, दि. ३ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बाळकृष्ण व मुलगा अवधूत यांनी विहिरीत उडी घेतली. त्यावेळी बाळकृष्ण यांचा मोठा भाऊ विनायक, बहीण लीलावती यांनी बाळकृष्ण यांना विहिरीतून वर काढले. अवधूतला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु यश आले नाही.
मी, काका आयुष्य संपवतोय
अवदूत याने दुपारी मोबाइलवर ‘मी आणि काका (वडील) आज आयुष्य संपवत आहोत. रानातल्या विहिरीत’ असे स्टेटस ठेवले. यामुळे जवळच्यांना माहिती मिळाली. म्हणून बाळकृष्ण कोळी यांना वाचविता आले.