सातारा : पितृ पंधरवडा सुरू झाल्यामुळे सध्या भाजीमंडईतील दर चांगलेच कडाडले आहेत. इतरवेळी दहा रूपये किलो मिळणाऱ्या भाज्या आत्या वीस रूपये पावशेर दराने घरी घेऊन जाण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.अनंत चतुर्थीनंतर लगेच सुरू झालेल्या पितृ पंधरवड्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाज्यांची मागणी असते. यातही भोपळा, भेंडी, गवारी, कारले, बटाटा, मेथी, ढेसा, या भाज्यांचा मान मोठा असतो. त्यामुळे दर काहीही असला तरीही या भाज्या करून त्याचा नैवैद्य दाखवणे ही प्रथा सर्वांकडेच रूढ आहे. पितृ पंधरवड्यामुळे भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या या भाज्यांची चढ्या दराने विक्री सुरू झाली आहे. आळूच्या पानांची दहा रूपयांना जुडी मिळत होती. आता दहा रूपयांत निम्मी जुडी मिळत असल्यामुळे नैवेद्यापुरतीही वडी करताना सामान्यांच्या जिवावर येवू लागले आहे. सातारा भाजी मंडईत सध्या टोमॅटो, पावटा, मुळा, बिन, दोडका यांच्या किंंमती वीस ते पंचवीस रूपये किलो अशा स्थिर आहेत. त्यामुळे अनेक घरांमध्ये सध्या कडधान्य आणि या भाज्यांचा वावर दिसत आहे. आहे. (प्रतिनिधी)ग्राहकच नाहीत..! --पितृ पंधरवडा सुरू झाला असला तरीही अजूनही ग्राहकांनी मंडईकडे पाठ फिरविल्याचे विक्रेते सांगत आहेत. शेतकऱ्यांकडून भाजी घेऊन आम्ही विकतो. दिवसभर उन्हात बसून भाजीविक्री करताना किलोमागे पाच दहा रूपये मिळतात; पण अलीकडे ग्राहकही हुशार झाले आहेत. या प्रथांमध्ये ‘शॉर्टकट’ काढून वर्षानुवर्षांची पध्दत पुढे नेण्याचा प्रयत्न दिसतो. पुढील काही काळात यापैकी प्रथाच शिल्लक राहणार नाहीत, असेही एका विक्रेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डाळींच्या दरांमध्येही वाढ!पितृ पंधरवडा सुरू झाल्यामुळे सध्या उडीद आणि मूग डाळीचे दरही एका किलोमागे दहा ते पंधरा रूपयांनी वाढले आहेत. पितृपंधरवड्यात या दोन्ही डाळींचे वडे केले जातात. त्यांना विशेष मान आहे. त्यामुळे या डाळींचेही दर कडाडल्याचे व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पितृ पंधरवड्यामुळे भाजीच्या वाकुल्या!
By admin | Published: September 30, 2015 9:21 PM