सातारा - राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे ३ दिवस सातारा दौऱ्यावर आहेत. म्हणजेच, सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या मूळगावी ते आहेत. त्यांच्यासमवेत अर्थातच यंत्रणांचा ताफा असून गावदौऱ्यातही त्यांच्याकडून कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील वाई तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यासाठी जात असताना मुख्यमंत्री शिंदेंनी आज त्यांच्या दरे या गावी वडिलांच्या मित्रासोबत आपुलकीने संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावातून जात असताना वाटेत एक वृद्ध व्यक्ती त्यांची वाट पाहत उभे होते. मुख्यमंत्र्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी, आपल्या गाडीचा ताफा थांबवत त्या वृद्ध व्यक्तीची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासमवेत आपुलकीचा संवादही साधला. माझे बाबा आणि तुम्ही एकत्र काम केलंय, बाबा आणि तुम्ही एकत्र होते, असे मुख्यमंत्र्यांनी विचारलं. त्यावर, हो.. हो असं त्या व्यक्तीने म्हटले. त्यानंतर मी बाबांना सांगतो असे म्हणत त्यांचं नाव विचारलं. त्यावेळी, दगडू हरी सुतार असं नाव त्यांनी सांगितलं. बाकी बरंय ना, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. त्यानंतर, त्या वृद्धास व्यवस्थीत सोडा, असे सांगत मुख्यमंत्र्यांची गाडी पुढे निघून गेली. मुख्यमंत्री आणि वृद्ध सुतार यांच्यातील भेटीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. दरम्यान, आज सकाळी वाई बांबू लागवड अभियानाच्या उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या साथीने बांबूची रोपे लावून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. बांबूचे रोप हे बहुगुणी आणि अनेक गोष्टींसाठी वापरले जाते. विशेष म्हणजे या रोपाला सध्या प्रचंड मागणी आहे. हे झाड जेव्हा मोठे होते तेव्हा बांधकाम साहित्यात पराती उभारण्याच्या कामापासून ते अनेक सुंदर व मनमोहक कलात्मक वस्तू, फर्निचर, लेखणी, डायरी तसेच आता केंद्र सरकारच्या धोरणामुळे तर विमानतळ किंवा इमारतींचा सुशोभीकरणासाठी देखील बांबूचा वापर केला जातो. बांबू लागवडीचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना देखील व्हावा तसेच ग्रामस्थांनी देखील बांबू पिकाची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करावी यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.