अजित जाधव -- महाबळेश्वर -‘हंगामी नको बारमाही तोडगा हवा’ या ‘लोकमत’च्या वृत्तामुळे महाबळेश्वर पोलीस व प्रशासन खडबडून जागे झाले. शहरात मोठ्या संख्येने साताराहून पोलीस फौजफाटा शहरात दाखल झाला आहे. २५ कर्मचारी व १० होमगार्ड आले आहेत, यामुळे सकाळपासून प्रवेश बंद, नो पार्किंग, अशा वाहनांना या पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे.क्षेत्र महाबळेश्वर येथील वृद्धाच्या मृत्यूने महाबळेश्वर पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर येताच सकाळपासून वेण्णा लेक, माखरिया गार्डन, शिवाजी चौक, सुभाष चौक व बाळासाहेब ठाकरे चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी उभे होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २५ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली, तर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेली वाहने क्रेनच्या साह्याने उचलून नेण्यात आली. वेण्णा लेक येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, यासाठी वायरलेस सिस्टीम बसविण्यात आली. चार जामर व अनेक दिवसांपासून बंद असलेली शहरातील वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासनाला जाग आली पण ‘क’ वर्गातील श्रीमंत असणाऱ्या महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेला केव्हा जाग येणार? असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. पर्यटकांना पॉइंटच्या रस्त्याबाबत माहिती नसते व शहरातील वाहतुकीबाबत कोणत्या ठिकाणी वाहनतळ आहे व नो पार्किंग ऐकेरी वाहतूक, दुहेरी वाहतूक असे फलक बसविले गेले पाहिजेत, या फलकाची लांबी व रुंदी मोठी ठेवली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना वाहनतळ व पॉइंटच्या रस्त्याची माहिती मिळू शकेल. याबाबत पालिका कारवाई करण्यास गेली असता नगरसेवकाचा मुख्याधिकाऱ्यांना फोन येतो की, ती व्यक्ती आपल्या वार्डमधील आहे, त्याचा हातगाडा हलवू नका. यामुळे सुभाष व शिवाजी चौकांमधील अनधिकृत हातगाडे हटत नाहीत. अतिक्रमणे हटणार केव्हा?महाबळेश्वर नगरपालिकेकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी पॉइंटबाबतचे फलक अतिशय लहान असल्यामुळे पर्यटकांना हे फलक दिसून येत नाहीत व वाहनतळ, ऐकेरी वाहतूक प्रवेश बंद अशा फलकांची गरज आहे व शहराच्या मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौक, सुभाष चौक येथील हातगाडे, घोडेवाले वाहतुकीला होणारे अतिक्रमण कधी काढणार, याबाबत पालिकेला केव्हा जाग येणार, असा प्रश्न जनतेस पडला आहे.
महाबळेश्वरात फौजफाटा दाखल
By admin | Published: December 25, 2015 11:10 PM