कऱ्हाड : तालुक्यात पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके वाया जाण्याची भीती शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे. यावर्षी पावसामुळे पेरण्या आगाप झालेल्या आहेत. मध्यंतरी पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. उसासारख्या पिकांना पाणी देता आले. मात्र सोयाबीन, भात, भुईमूग अशा पिकांना पाणी देता आले नाही. मात्र, आता अचानक पाऊस सुरू झाला आणि शेतात पाणी साचून राहिले. वा-यामुळे ऊसही भुईसपाट झाला आहे. त्यामुळे पिके वाया जातात की काय, अशी भीती शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे. सोयाबीन, भुईमूग व माळव्याची पिके पाणी साचल्यामुळे कुजून जाण्याची शक्यता असून शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूर नाक्याकडे जाणा-या रस्त्याची दुर्दशा
कऱ्हाड : शहरातील दैत्यनिवारिणी मंदिर ते जलशुद्धीकरण केंद्रापासून कोल्हापूर नाक्याकडे जाणा-या मार्गावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यात आदळून नुकसान होत आहे. किरकोळ अपघातही घडत आहेत. त्यामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत. संबंधित विभागाने तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी
कऱ्हाड : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणा-या उपमार्गावर वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केले जात आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी निर्माण होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणा-या सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांचे अस्ताव्यस्तपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
कऱ्हाडात वाहनधारक खड्ड्यांमुळे त्रस्त
कऱ्हाड : शहरातील दत्तचौक, पोपटभाई पेट्रोलपंप चौक तसेच कोल्हापूर नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुख्य चौकासह अंतर्गत भागातही पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोपटभाई पेट्रोलपंपापासून भेदा चौकाकडे जाणा-या तसेच भेदा चौकातून पंचायत समितीकडे जाणा-या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे वाहने आदळून नुकसान होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची गरज आहे.