सचिन काकडे -- सातारा --अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर सध्या नैसर्गिक संकट ओढावले आहे. डोंगरावर असलेली कैक टन वजनाची दगडी खाली कोसळू लागली आहे. याचा प्रत्यय येथील नागरिकांनी आता येऊ लागला आहे. रविवारी सायंकाळी सुमारे एक ते दीड टन वजनाचा भला मोठा दगड किल्ल्यावरून थेट एका घराच्या भिंतीवर येऊन आदळला. ही धडक एवढी मोठी होती की, भिंतीला मोठे भगदाड पडले तर घरालाही भेगा पडल्या.अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक वसाहती वसल्या आहेत. गेल्या २० ते २५ वर्षांपासून याठिकाणी नागरिकांचे वास्तव्य आहे. या डोंगरावर गेल्या अनेक वर्षांपासून कैक टन वजनाची दगडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. पावसाळा आला की नागरिकांना पाऊस-पाण्यापेक्षा दगडी कोसळण्याचीच अधिक भीती असते. रविवारी सायंकाळच्या सुमारास येथे राहणाऱ्या रमेश गुजाबा शेंडे यांच्या घरावर अचानक सुमारे दीड टन वजनाचा भला मोठा दगड येऊन कोसळला. सुदैवाने घरात कोणीही नसल्याचे मोठा अनर्थ टळला. मात्र, शेंडे यांच्या घराच्या भिंतीला भले मोठे भगदाड पडले. तसेच घराला भेगाही पडल्या. यामध्ये शेंडे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ही घटना समोर येताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाळी. घराच्या भिंतीवर आदळलेला दगड पाहून लहान मुलांसह अनेकांचे चेहरे भीतीने भेदरले. किल्ल्यावरील दगडांची नागरिकांच्या मनात किती भीती आहे, हे प्रत्येकाचे चेहरे सांगत होते. भयभित अवस्थेत अनेकांनी रात्र जागून काढली. भिंत बांधा.. अथवा दगडी तरी फोडा !पावसाळा सुरू झाला की पाण्यामुळे दगडाखाली असलेल्या मातीचे वहन होते. यामुळे छोटी-मोठी दगडी किल्ल्यावरून खाली कोसळतात. उतारामुळे कोसळलेल्या दगडाचा वेगही वाढतो. झाडांमुळे हा वेग काही प्रमाणात मंदावत असला तरी धोका मात्र टळत नाही. आजपर्यंत अनेकदा या ठिकाणी अशा प्रकारच्या लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत. हा धोका टाळण्यासाठी वसाहतींच्या वरील बाजूस संरक्षक भिंत बांधावी, अथवा मोठ-मोठाली दगडी जागेवरच फोडण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.नशीब बलवत्तर म्हणून..ज्यावेळी घरावर दगड कोसळला त्यावेळी रमेश शेंडे यांच्या घरात कोणीही नव्हते. घरातील सर्व सदस्य दरे या गावी राहतात. दगडाची धडक इतकी जोरदार होती की, भींतीला मोठे भगदाड पडल्याने घरात सर्वत्र विटा विखुरल्या गेल्या. तसेच घराच्या भिंतीलाही भेगा पडल्या. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. सुमारे दोनशे फुटांवरून घराच्या भिंतीवर कोसळलेल्या दगडाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठेकाच चुकला. पावसामुळे वीज कोसळली की काय, असा काही नागरिकांचा समज झाला. मात्र, घरातून बाहेर आल्यानंतर त्यांना वेगळेच चित्र दिसले.
डोक्यावर भीतीचा दगड
By admin | Published: July 04, 2016 10:41 PM