कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासन व जिल्हा प्रशासन संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पाच दिवस कडक निर्बंध लावत ‘वीकेंड लॉकडाऊन’ पुकारण्यात आले होते. शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. आता तर संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी मिळेल, त्या दुकानात नागरिक पोहोचल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. बझारसह दुकानात दिवसभर प्रचंड गर्दी होती. गर्दीला आवरताना दुकानदारांना चांगलीच कसरत करावी लागली. रांगेत येणाऱ्यांना व एका वेळेस पाच नागरिकांना प्रवेश देता येत असल्यामुळे मलकापूर येथील डी मार्टच्या प्रवेशद्वारावरच गर्दी झाली, तसेच दुकानांसमोरही लांबचलांब रांगा लागल्या. ढेबेवाडी मार्गावर मंडई खरेदीसाठीही तोबा गर्दी झाली.
कऱ्हाड शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. या गर्दीतून वाट काढीत अनेक जण किराणा दुकानांकडे धाव घेत होते. गर्दीला आवरताना पोलिसांचीही दमछाक झाली. ध्वनिक्षेपकाद्वारे पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येत होत्या. मात्र, तरीही बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात येत नव्हती. रात्री आठ वाजेपर्यंत बाजारपेठेतील रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ दिसून येत होती.
- चौकट (फोटो आहे)
कळक खरेदीची लगबग
मलकापूर फाटा व कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर शुक्रवारी काही ठिकाणी गुडीपाडव्यासाठी कळक विक्रेते बसले होते. लॉकडाऊनचे काय होणार, या विचाराने अनेक नागरिकांनी कळक खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
- चौकट (फोटो आहे)
अनेक दुकानांमध्ये वादावादी
शनिवार व रविवार दोन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद होती. आता कडक लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी नागरिक तातडीने साहित्य घेण्यासाठी घराबाहेर पडले. परिणामी, दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झाली. या गर्दीवर नियंत्रण ठेवताना दुकान मालकांची ग्राहकांशी वादावादी झाल्याचेही पाहायला मिळाले.
फोटो : १२केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गालगत मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी ग्राहकांनी सोमवारी मोठी गर्दी केली होती. (छाया : माणीक डोंगरे)