सातारा : सामान्य सातारकरांची क्षुधा भागविणाऱ्या राजवाडा चौपाटीवर विद्युत खांबाच्या वीजवाहक तारा धोकादायक ठरत आहेत. खांबाच्या खालील बाजूस असलेल्या या तारा पावसात भिजत आहेत. त्यातून आवाजही येत असल्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
येथील राजवाडा चौपाटीवर भेळ, वडापाव, पाणीपुरी, पावभाजी, डोसा, उत्ताप्पा याबरोबरच चायनीज खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे गाडे आहेत. सुमारे ७० व्यावसायिक येथे रोज उद्योग करतात. सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना परवडेल असे खाद्यपदार्थ येथे मिळत असल्यामुळे सातारकरांची चौपाटीला पसंती असते. सणाची खरेदी झाली की राजवाड्यावर पोटपूजा करूनच घरी जाण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. त्यामुळे संध्याकाळी येथे खवय्यांची गर्दी असते.
गेल्या काही दिवसांपासून अचानक पाऊस पडत आहे. पावसापासून हातगाडी व ग्राहकांचे संरक्षण व्हावे, यासाठी ठिकठिकाणी प्लास्टिकच्या कागदांचे छत करण्यात आले आहे. या छतासाठी हातगाडीला दोऱ्या बांधण्यात आल्या आहेत. या छताचे पाणी कित्येकदा चौपाटीवर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खांबावर पडते. त्यामुळे कित्येकदा तिथून ठिणग्या उडत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांचाही जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे या खांबातील वायरचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.अन्यथा मोठा अनर्थ होईल
दिवाळी सणाच्या खरेदीनिमित्त घराबाहेर पडणारे आणि बाहेरूनच खाऊन जाणारे सातारकरांची संख्या उत्सव काळात वाढते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे सध्या ढगाळ वातावरण आहे. राजवाडा चौपाटीमध्ये प्रत्येक हातगाडीवर किमान दोन सिलिंडर आहेत. अपघाताने जरी या विद्युत तारांची ठिणगी पडली तर अवघी चौपाटी खाक होण्याची भीती आहे.
उत्सव काळातील गर्दी आणि गडबड लक्षात घेता महावितरणने तातडीने उपाययोजना करून या विद्युत तारांचे नियोजन करावे, अश्ी मागणी चौपाटीवरील व्यावसायिक करीत आहेत.