संजय पाटीलकऱ्हाड : भित्यापोटी ब्रह्यराक्षस, असे म्हणतात. युवतींबाबतही सध्या असेच होत आहे. गर्दीत असूनही त्या घाबरत असून, संकुचित राहत आहेत. आसपास भिरभिरणाऱ्या नजरा त्यांना भीती दाखवत आहेत. गर्दीत असूनही असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात घर करीत असून, कऱ्हाडात अशा नजरांवर सध्या निर्भया पथक ‘वॉच’ ठेवून आहे.पावलोपावली भेटणारे रोमिओ युवतींचा अक्षरश: पिच्छा पुरवतात. जिथे जावे तिथे अनपेक्षित नजरा युवतींच्या हृदयाचा ठोका चुकवतात. त्यामुळेच गर्दीत असूनही असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. बस स्थानकासह इतर सार्वजनिक ठिकाणी युवती, तसेच महिला स्वत:ला सावरत उभ्या असतात. आजूबाजूला रिकामी जागा असतानाही युवती एकाच ठिकाणी घोळका करून थांबलेल्या दिसतात. एकटी मुलगी क्वचितच दिसते. दोन किंवा अधिक मैत्रिणींना सोबत घेऊन युवती थांबते. अथवा पायी प्रवास करते. छेडछाड करणारे ‘रोमिओ’ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असले, तरी त्यांच्या अनपेक्षित नजरांना घाबरणाऱ्या युवती प्रत्येक युवकाकडे प्रश्नार्थकच पाहतात. त्यांच्या मनात भीती कायम घर करून असतेच.
सगळे सारखे नसतात; पण ‘त्यांना’ ओळखणार कसं ?काहीजण एकट्या मुलीकडे विचित्र नजरेने पाहतात. त्यांच्या पाहण्याचीही युवतींना भीती वाटते. कॉलेजच्या बस थांब्यावर आणि बस स्थानकातही एकटीने फिरणे मुश्कील असते. सगळे सारखे नसतात. मात्र, जे विकृत आहेत, त्यांना ओळखणार कसं? असा प्रश्न युवतींना सतावतो.
भीती वाटतेय.. कॅमेरा पाहतोय का?सध्या सोशल मीडियाचं ‘फॅड’ एवढं वाढलंय की, हे फॅड युवतींची डोकेदुखी ठरत असल्याचे दिसते. बस थांब्यावर, महाविद्यालय परिसर, तसेच रस्त्यावरही युवतींच्या नकळत त्यांच्या बोलण्याचे, चालण्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाते आणि ते रेकॉर्डिंग ‘एडीट’ करून सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केले जाते. त्यामुळे मोबाइलच्या कॅमेऱ्याचीही भीती वाटत असल्याचे युवतींचे म्हणणे आहे.
कऱ्हाडात निर्भया पथकाकडून कारवाईनिर्भया पथक उपअधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीत काम करते.पथकासाठी स्वतंत्र शासकीय वाहन उपलब्ध आहे.वाहनातून या पथकाची गर्दीच्या ठिकाणांवर गस्त असते.साध्या वेशातील पोलिस छेडछाड करणाऱ्यांना हेरून कारवाई करतात.युवती, महिलांनी तक्रार दिल्यासही या पथकाकडून कारवाई होते.कॉलेज परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांनाही या पथकाच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
कारवाईची सरासरीदंडात्मक कारवाई : १९ टक्केप्रबोधन, समज : १४ टक्केप्रतिबंधात्मक कारवाई : ३९ टक्केन्यायालयात दाखल : २८ टक्के
दीड वर्षात..३३३५ : एकूण कारवाई१,५२,६७० : वसूल दंड
निर्भया पथकाने केलेली कारवाईकायदा : कारवाई : दंडएमपी ॲक्ट : २४२० : ०न्यायालयात : २२ : १३,६००मो. वा. कायदा : ८४० : १,३९,०७०प्रबोधन, समज : ५३ : ०(जानेवारी २०२३ ते जुलै २०२४ अखेर)