सातारा : कऱ्हाड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील एका शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपालला १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. रत्नमाला रामदास जाधव (वय ५२, मूळ रा. शाहूनगर, बीड) असे या गृहपाल महिलेचे नाव आहे. पेन्शन मिळवून देण्याच्या प्रकरणात ही लाच घेण्यात आली होती. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल, गुरुवारी ही कारवाई केली.याबाबत माहिती अशी की, उत्तर पार्ले येथे बीसी-ओबीसी मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी रत्नमाला जाधव या गृहपाल आहेत. सासूबाईच्या मृत्यूनंतरची सेवानिवृत्ती पेन्शन सासऱ्यांना मिळावी, यासाठी तक्रारदार महिला प्रयत्न करत होती. यासाठी गृहपाल यांनी तक्रारदार महिलेकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.त्यानंतर तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने काल, गुरुवारी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गृहपाल रत्नमाला जाधव यांना साताऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये हवालदार संभाजी काटकर, तुषार भोसले, श्रध्दा माने, शीतल सपकाळ आदी सहभागी झाले होते. दरम्यान, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपाल १५ हजारांची लाच स्वीकारताना जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 5:06 PM