सातारा : सासरच्या लोकांकडून विवाहितेच्या जाचहाटाच्या घटना समोर येत असतानाच कायदा राबविणाऱ्या महिलाही यातून सुटल्या नाहीत. पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा तिच्या मुलाच्या वाढदिनीच सासरकडील काहींनी गळा दाबला. तर दुसरीकडे त्या महिला अधिकाऱ्याकडून तब्बल दहा लाख रुपये घेऊन सासूच्या नावावर जमीन करून त्यांची फसवणूक केली. ही धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील चिंचणी येथे घडली आहे.या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यामध्ये पती प्रशांत शिवाजी शिंदे, सासू मंगल शिवाजी शिंदे (दोघे रा. चिंचणी, ता. सातारा), नणंद हेमा गणेश भोसले, नंदावे गणेश भोसले (रा. सैदापूर रोड, मोळाचा ओढा, सातारा), नणंद दिपाली गणेश जाधव, नंदावे गणेश जाधव (रा.वल्लभनगर, पिंपरी चिंचवड, पुणे) या सासरच्या लोकांचा समावेश आहे. याबाबत पुणे शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका ३१ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे.त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २०१४ पासून आजपर्यंत वरील संशयितांनी मानसिक व शारीरीक छळवणूक केली. २०१४ व २०१९ मध्ये पती प्रशांत शिंदे, सासू मंगल आणि नणंद हेमा भोसले यांनी इच्छेविरूद्ध गर्भपात केला. तसेच मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी नणंद हेमा भोसले व दिपाली जाधव यांनी गळा दाबला. तसेच पती प्रशांत शिंदे यांनी तुझ्या नावावर जमीन घ्यायची आहे, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यासाठी एसबीआय बॅंकेचे वैयक्तीक ८ लाख २० हजार रुपये कर्ज काढायला सांगितले. व प्रशिक्षण काळातील १५ महिन्यांचा पगार असा एकूण १० लाख रुपये सासू व पती यांच्या खात्यावर घेतले. परंतु जमीन मात्र, सासूच्या नावावर करून फसवणूक केली.
महिला पोलीस अधिकाऱ्याचा सासरकडून जाच, मुलाच्या वाढदिनीच दाबला गळा; साताऱ्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 3:59 PM