महाबळेश्वर : केट्स पॉइंट परिसरातील नीडल होल पॉइंट येथील सुरक्षा कठड्यावर बसून मोबाईलवर धबधब्याचा फोटो काढताना तोल जाऊन सातशे फूट दरीत कोसळल्याने नवविवाहितेचा मृत्यू झाला. अंकिता सुनील शिरस्कर (वय २३, सध्या रा. धनकवडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या या नवविवाहितेचे नाव आहे. केट्स पाॅइंट हा महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. मंगळवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.रेल्वेमध्ये लोको पायलट (चालक) असलेले सुनील ज्ञानदेव शिरस्कर (वय ३०, मूळ रा. उंबरेगव्हाण, ता. जि. धाराशिव) हे पत्नी अंकितासह दुचाकीवरून येथे पर्यटनास आले होते. सोमवारी त्यांनी महाबळेश्वरमधील विविध पॉइंट पाहिले आणि मंगळवारी दुपारी पुण्याकडे जाण्यास निघाले.महाबळेश्वरपासून सहा किलोमीटरवर आले असता, अंकिताने पुन्हा केट्स पॉइंट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पतीने नकार दिल्यानंतरही अंकिताने हट्ट धरल्याने हे दाम्पत्य सायंकाळी साडेचार वाजता केट्स पॉइंट येथे पोहोचले. केट्स पॉइंट पाहून ते नीडल होल व परिसरातील धबधबा पाहण्यासाठी पाॅइंटवरील सुरक्षा कठड्यावर बसून फोटो काढत होते.धबधब्याचा फोटो व व्हिडीओ घेताना खाली वाकून पाहत असताना अचानक अंकिता ही कठड्यावरून थेट सातशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून वर काढण्यात ट्रेकर्सना यश आले.
अंकिताचे सुखी संसाराचे स्वप्न अधुरेसुनीलसोबत अवघ्या दहा महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढलेल्या अंकिताचे सुखी संसाराचे स्वप्न अकाली जाण्याने अधुरेच राहिले. सुनीलला नोकरीतून सुटी मिळणे दुरापास्त झाले होते. त्यातच डिसेंबर २०२३ मध्ये तो पुढील प्रशिक्षणासाठी भुसावळ येथे जाणार होता. त्यापूर्वी महाबळेश्वर येथे पर्यटनास जाण्याचा त्यांनी बेत आखला होता.