नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘सण कुणाला करू वाटत न्हाय; पण पोटाचं पण बघावं लागतं. एका दिसाचा खडा पडला तर तोटाच म्हणायचा, त्यात वाडं विकून रोख पैसं मिळतात. संसाराला तेवढाच हातभार हुतू. सण करायचा म्हंजी गावाला जावं लागंल, त्यापेक्षा फडातच काम करतुया,’ ही उद्विग्नता व्यक्त केलीय ऊसतोड मजूर मनीषा बोडरे यांनी.सोलापूर जिल्ह्यातील बचेरी (ता. माळशिरस) येथील एक कुटुंब सध्या वरकुटे मलवडी परिसरात साखर कारखान्यासाठी ऊस तोडायला आले आहे. या कुटुंबातील मनीषा बोडरे. त्यांच्या बरोबर पती भीमराव बोडरे आहेत. याशिवाय मनीषा बोडरे यांची बहीण पिंटाबाई बोडरे (पिलीव, ता. माळशिरस), मुलगी सुवर्णा बुधावले (राजेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) हे आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून मनीषा बोडरे व त्यांचे नातेवाईक हे माण, वरकुटे मलवडी परिसरात ऊस तोडतात. दोन महिन्यांपूर्वी फटकरीसाठी घर सोडले आहे. अद्याप ते घरी परतले नाहीत. मकर संक्रांतीचा सण असूनही दिवसभर या महिला उसाच्या फडात काम करत होत्या. मनीषा बोडरे यांचे पती ऊसतोड करत होते तर त्या पाठीमागे वाडे बांधत होत्या. संक्रांतीच्या सणाला गावी का गेला नाही, असे म्हणून मनीषा बोडरे यांना बोलते केले. तेव्हा त्या सांगू लागल्या.‘आम्ही दरवर्षी ऊस तोडीला लांब-लांब जातू. गेल्या दोन महिन्यांपासून वरकुटे परिसरात हाय. माज्याबरुबर मालक भीमराव, बहीण, मुलगी, जावय फटकरीवर आलूया. आता कारखान्याचा पटा पडलं तवाच घरी जाणार. ऊस तोडायला असल्यावर सण कुठला आमाला. एक दिस खाडा पडला तर आख्खा दिस वाया जातू. दुष्काळ असल्यानं शेतकरी फडात वाडं न्यायला येत्यात. त्यामुळं रोज चार पैसं पदरात पडत्यात.त्या पैशात त्याल, मिठाचं भागतं. संसाराला तेवढाच हातभार लागतू. त्यामुळं संक्रांतीच्या सणाला गावाला गिलू न्हाय. ही उसाचं फडच आमच पॉट हाय. चार पैसं कसं मिळत्याल, ती बघतू.’अशीच उद्विग्नता मनीषा बोडरे यांच्याबरोबर ऊसतोडीसाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईक महिलांचीही आहे. ही व्यथा ऊस तोड महिलांसह त्यांच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सण कुठला, आम्हाला पोटाचं पडलंय; कुटुंबाच्या गोडीसाठी हातात कोयता; सोलापूर जिल्ह्यातील मजूर साताऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:01 AM