लखन नाळे -- वाठार निंबाळकर --फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वारदान ठरणारे तालुक्यातील सर्वच पाझर तलाव, तलाव दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.फलटण तालुक्यात दुष्काळात १९७२ साली व त्यानंतर १९८० व १९८५ साली तालुक्यातील कायमदुष्काळी पट्ट्यातील ताथवडा, ढवळ, मानेवाडी, शेरेचीवाडी, खडकी, मलवडी, तरडफ, वाठार निंबाळकर, वेळोशी, दरेवाडी, जाधवनगर, दालवडी, मिरेवाडी, वाखरी, दुधेबावी, बोडकेवाडी, तिरकवाडी, सासकल, धुमाळवाडी, गिरवी आदी गावांसह आदर्की ते आंदरुढ या पट्ट्यातील सर्वच गावांमध्ये लहान-मोठे तलाव बांधण्यात आले होते. या तलावांमुळे त्या-त्या परिसरातील विहिरींना पाणीपातळी टिकून राहण्यास मदत झाली होती.मात्र, तलाव निर्मितीपासून आज अखेर त्या तलावांची दुरुस्ती न झाल्याने तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला गेला असून तलावांच्या दगड मातीच्या भिंती जीर्ण होऊन त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. परिणामी कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी तलावात पाणी येऊनही ते पाणी वाहून जाऊन तलाव कोरडा पडला जात आहे. सध्या फलटण तालुक्यात उपळवे गावापर्यंत धोम-बलकवडीचे पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पाट फाट्यांचे काम पूर्ण नसल्याने हे पाणी ठिकठिकाणी तलावांमध्ये सोडले आहे. मात्र, हे तलाव नादुरुस्त असल्याने सोडलेले पाणीही वाहून वाया जात आहे. तलाव दुरुस्त्यांबाबतचे प्रस्ताव संबंधित सर्वच गावांनी पाटबंधारे व लघू पाटबंधारे विभागांना दिले असून शासनाकडून या तलाव दुरुस्ती कामांची दखल घेऊन तातडीने तलाव दुरुस्ती करण्याची मागणी तलावाचा लाभ मिळणारे सर्व गावातील शेतकरी करीत आहेत. काही ंिठकाणी टॅँकरने पाणीपुरवठाफलटण तालुक्याच्या बहुतांश ठिकाणी गेली काही दिवस टॅँकरने पाणीपुरवठा सुरू होता. धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये पाणी सोडल्याने सध्या काही ठिकाणचा पाणी प्रश्न मिटला आहे. वेळोशी, सावंतवाडी या ठिकाणी सुरू असणारे टॅँकर बंद करण्यात आले आहेत. मात्र, दरेचीवाडी, ठाकुरकी-गोळेगाव या ठिकाणी अजुनही पाणीटंचाई जाणवत असल्याने दररोज अडीच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळा संपला तरी पाण्यासाठी परवड सुरू असल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे. १९६० साली सासकल गावच्या हद्दीत मोठा तलाव ओढ्यावर बांधण्यात आला. त्यामुळे भाडळी, सासकल, सोनवडी, तिरकवाडी, झिरपवाडी आदी गावांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना कायम पाणी राहात होते. मात्र, गेली १५-२० वर्षांपूर्वी तलावाची भिंत जीर्ण होऊन वाहून गेली असल्याने आता कितीही मोठा पाऊस झाला तरी तलावात पाणी थांबत नाही.- मोहनदादा डांगे , ज्येष्ठ नागरिकवाखरी-वाठार निंबाळकर, शेरेवाडी व ढवळ या गावांना वरदान ठरणाऱ्या वाखरी तलावांची दुरवस्था झाली असून तलाव दुरुस्ती झाल्यास आमचा शेती पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात तरी मार्गी लागेल.- रामभाऊ ढेकळे, शेतकरी
फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वारदान ठरणारे पावसातही तलाव कोरडेच!
By admin | Published: September 09, 2014 11:00 PM