कोरेगाव : खासगी बस वाहतूकदारांच्या तुलनेत आता एसटी महामंडळाने आधुनिकीकरणाची कास धरली आहे. डिझेलला पर्याय म्हणून सीएनजीच्या वापरास सुरुवात झाली. आता केंद्र सरकारच्या धोरणानुसार शंभर इलेक्ट्रिक बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी पुणे (स्वारगेट)- सातारा मार्गावर १० तर पुणे-महाबळेश्वर मार्गावर ५ बसेस धावणार आहेत. या बसेस वातानुकूलित असून, त्यांचे चार्जिंग स्टेशन पुण्यातच राहणार आहे.
महामंडळाचे साताऱ्यातील तत्कालीन विभाग नियंत्रक व सध्याचे महाव्यवस्थापक प्रतापसिंह सावंत यांच्या संकल्पनेतून सातारा-स्वारगेट-सातारा मार्गावर विना थांबा, विना वाहक बससेवा सुरू करण्यात आली होती. राज्यात अव्वल ठरलेली ही बससेवा प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीस उतरली आहे. त्यापाठोपाठ मुंबई सेंट्रल आणि बोरिवली मार्गावरही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला लालपरी, त्यानंतर हिरकणी व आता काही शिवशाही बसेस या मार्गावर धावत आहेत.
प्रवाशांना वेगवान आणि किफायतशीर प्रवासासाठी लालपरी बसेस अपेक्षित असल्याने सध्या सातारा-पुणे मार्गावर याच बसेस धावत आहेत. डिझेलच्या दरात सतत होणारी वाढ आणि तुटवडा यामुळे एसटी महामंडळाने सीएनजी बसेसचा पर्याय काढला होता. मात्र, या बसेस केवळ महानगरांमध्ये धावत आहेत. त्याचा ग्रामीण भागातील प्रवाशांना कोणताही फायदा होत नाही.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार एसटी महामंडळ आता शंभर इलेक्ट्रिक बसेस जीसीसी अर्थात ग्रॉस कॉस्ट कॉंट्रॅक्ट तत्त्वावर आपल्या ताफ्यात नजीकच्या काळात आणणार आहे. त्यासाठी त्यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ही प्रक्रिया पूर्णत्वास जाणार आहे. साधारण सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन या बसेस मे महिन्यात धावण्याची शक्यता आहे.
चौकट
४३ आसन क्षमता
एसटी महामंडळाने निविदा प्रक्रिया राबविताना संभाव्य सतरा मार्गांची यादी सोबत जोडली आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथे चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. पुण्यातून दहा बसेस सातारा मार्गावर, महाबळेश्वर मार्गावर पाच बसेस, कोल्हापूर मार्गावर सहा बसेस, सोलापूर मार्गावर पाच बसेस, कोल्हापूर-बेळगाव मार्गावर पाच बसेस आणि सोलापूर-विजापूर मार्गावर पाच बसेस धावणार आहेत. बारा मीटर लांबी असलेली ही बस आधुनिक असणार आहे. त्यामध्ये ४३ प्रवासी आसने राहणार आहेत. संपूर्ण वातानुकूलित असणारी ही बस प्रवाशांच्या पसंतीस निश्चितपणे उतरणार आहे
फोटो ३०इलेक्ट्रीक एसटी
एसटीच्या ताफ्यात याच इलेक्ट्रीक गाड्या दाखल होणार आहेत.