कराड : केरळहून गुजरातकडे काजू घेऊन निघालेल्या मालट्रकमधील सुमारे १५ लाख रुपये किमतीचा ४ टन काजू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, ज्या ट्रकमधून हा चार टन काजू चोरीस गेला त्या ट्रकचे चालक व क्लिनर ट्रकमध्येच झोपले होते. मात्र, हा चोरीचा प्रकार सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ राज्यातील कोलम येथून सुमारे ३० लाख रुपये किमतीचा ८ टन काजूचा माल ट्रकमधून (एमएच ११ पी ३५१०) गुजरात राज्यातील वाती येथे नेण्यात येत होता. शुक्रवारी रात्री संबंधित ट्रक कऱ्हाडनजीक पोहोचला. चालक व क्लिनर जेवणासाठी कऱ्हाड येथे थांबणार होते. त्यामुळे त्यांनी ट्रक पाटण तिकाटण्यातील उड्डाणपुलाखालून कऱ्हाड शहरात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटण तिकाटण्यात ट्रकमधील डिझेल संपले. त्यामुळे ट्रक बंद पडला. ट्रकमध्ये डिझेल नसल्यामुळे चालक व क्लिनरने त्याचठिकाणी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. जेवण आटोपल्यानंतर रात्री ट्रकचालक व त्याचे सहकारी ट्रकमध्येच झोपले. शनिवारी सकाळी त्यांची झोप गेल्यानंतर त्यांनी खाली उतरून पाहिले असता ट्रकची ताडपत्री काढून आतील प्रत्येकी ५० किलो वजनाची १४ लाख ९९ हजार ५०० रुपये किमतीची ७१ पोती व २० किलोचा एक बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांचे निदर्शनास आले. याबाबत ट्रक चालक हणमंत नंदकुमार ढेकणे (वय ३१, रा. लोहारे-वाई) याने कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
पंधरा लाखांचा काजू ट्रकमधून लंपास
By admin | Published: June 13, 2015 11:55 PM