कार्वे परिसराला बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून येथे उसाच्या प्रमुख पिकांसह अन्य पिके घेतली जातात. मात्र, या परिसरातून कृष्णा कॅनॉलचा मुख्य कालवा गेला असून त्यामुळे दळणवळणासह शेतमाल वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. पुलाअभावी येथील दळणवळण गैरसोयीचे ठरत आहे. तसेच बुलबुलमळा येथे नागरी वस्ती असून धानाईदेवीकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. सध्या कालवा ओलांडण्यासाठी कालव्यावर लाकडी व लोखंडी पोल टाकून मार्ग तयार केला गेला आहे. अशा धोकादायक मार्गावरून शेतकरी व ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास चालू आहे.
दरम्यान, कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह वाढल्यावर त्याठिकाणी अपघाताच्या घटनादेखील घडत असतात. येथील वाहतुकीची परिस्थिती बिकट असल्याने कार्वे परिसरातील ग्रामस्थांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन याबाबतची समस्या सांगितली होती. या ठिकाणी कालव्यावर पूल करून दळणवळणाची सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार, खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पुलासाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
- चौकट
शेतमाल वाहतूक होणार सुखकर
कार्वे परिसरातील बुलबुल मळ्यासह परबतवाडा, सतूकाशीवाडा येथील ग्रामस्थांना या पुलाचा उपयोग होणार आहे. तसेच बारमाही पिके घेण्यात येत असलेल्या शेतक-यांना व ऊस वाहतुकीच्या दृष्टीने या पुलामुळे मोठी सोय होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे निकाली लागला आहे.
फोटो : २०केआरडी०४
कॅप्शन : कार्वे-बुलबुलमळा, ता. क-हाड येथील कालव्यावर लाकूड आणि पाइप टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला असून हा पर्याय धोकादायक ठरत आहे.