सातारा : सातारा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेक वाहनधारक संचारबंदीचे नियम पायदळी तुडवून बाजारपेठेत विनाकारण फिरत आहेत. अशा वाहनधारकांची शुक्रवारी प्रशासनाच्या फिरत्या पथकाने रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. दिवसभरात ५० जणांची तापसणी केल्यानंतर त्यामध्ये एका महिलेसह तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. संक्रमण रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परंतु, नागरिक व वाहनधारकांकडून शासन नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. बहुतांश नागरिक दवाखान्याचे कारण पुढे करीत बाजारपेठेत फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे तहसीलदार आशा होळकर यांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले असून, याची जबाबदारी पंचायत समिती व सातारा पालिकेवर सोपविण्यात आली आहे.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या कामी एक वाहन, एक डॉक्टर, एक तंत्रज्ञ व एक परिचारिका असे पथक तयार केले आहे. शुक्रवारी सकाळी या पथकाने पोलीस बंदोबस्तात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची रॅपिड अॅँटिजेन टेस्ट केली. एकूण ५० जणांची या पथकाचे चाचणी केली. यामध्ये एक महिला व दोन पुुरुष अशा तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. संबंधितांचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, प्रशासनाच्या या अनोख्या मोहिमेमुळे बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात तर येईल शिवाय विनाकारण फिरणाऱ्यांवरही अंकुश बसेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.
फोटो : ३० जावेद खान ०१
सातारा पालिका व पंचायत समितीच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी पोवई नाका येथे विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची कोरोना चाचणी केली. (छाया : जावेद खान)