दहिवडी : श्री शांतिगिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल व काॅमर्स काॅलेज मलवडी (ता. माण) या शाळेने २०२०-२१ या वर्षाची पन्नास टक्के फी माफ करून कोरोना महामारीच्या काळात पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
महंत श्री शांतिगिरीजी महाराज यांनी चारित्र्यवान व गुणवान विद्यार्थी घडविण्यासाठी शाळा सुरू करण्याचा ध्यास घेतला, तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मलवडी येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. शाळेत के.जी. ते बारावीपर्यंत मुले शिकत आहेत. कोरोनाकाळात सतत ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात शाळा यशस्वी ठरली आहे.
मात्र, कोरोना महामारीने ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले आहे. बहुतांशी शेतीवर अवलंबून असणारे पालक मेटाकुटीस आले आहेत. पाल्यास इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी धडपडणाऱ्या पालकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. पालकांची ही अवस्था लक्षात येताच शांतिगिरीजी महाराजांनी त्यांना फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांची २०२०-२१ या वर्षाची पन्नास टक्के फी माफ करण्यात आली आहे.